राजीव गांधींबद्दल मोदींनी केलेल्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना "तुमच्या वडिलांना पक्षातील स्तुतीपाठकांनी 'मिस्टर क्लीन'ची उपमा दिली होती. 'मिस्टर क्लीन' प्रतिमेचा गाजावाजा केला होता. मात्र त्यांचं आयुष्य 'भ्रष्टाचारी नंबर वन' म्हणूनच संपलं." असं वक्तव्य केलं होतं.
त्या वक्तव्यानंतर राहुल गांधींनी ट्वीट करून नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर देताना "मोदीजी, युद्ध संपलेलं आहे. तुमची कर्मं वाट पाहत आहेत. स्वतःबद्दलचे विचार माझ्या वडिलांना लागू करून तुम्ही तुमचा बचाव करू शकत नाही." असं प्रत्युत्तर दिलं होतं. तसंच मोदींच्या या वक्तव्यानंतर मोदींवर विरोधी पक्षातील नेत्यांबरोबरच सोशल मीडियावरील नेटिझन्सने देखील मोदींची चांगलीच धुलाई केली आहे.
त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फेसबुक पोस्टद्वारे मोदींवर टीका केली आहे. ‘दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नाही’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काय म्हटलंय राज ठाकरे यांनी?
आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही.