भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात कोणालाही अधिकृत उमेदवारी न देता माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
विलास लांडे यांना काँग्रेससोबतच शिवसेना आणि भाजपमधील नाराजांची साथ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे. परंतु, ते अर्ज माघारी घेऊन विलास लांडे यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे विरूद्ध माजी आमदार विलास लांडे यांच्यात लक्षवेधी लढत रंगणार हे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
आघाडीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघात लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.
माजी आमदार विलास लांडे आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यापैकी एकजण राष्ट्रवादीचा उमेदवार असेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु, राष्ट्रवादीने या मतदारसंघात अधिकृत उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे. परंतु, ते आपला उमेदवारी अर्ज माघार घेऊन लांडे यांच्या पाठीशी राहणार आहेत. लांडे हे इतर सर्व राजकीय पक्ष आणि भाजप नाराजांच्या पाठिंब्याने आमदार महेश लांडगे यांना घाम फोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोसरीतील लढत 2014 पेक्षा यंदा अधिक लक्षवेधी ठरणार आहे.