महाराष्ट्र विधानसभा निवडणुक ऐन तोंडावर असताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात आत्तापर्यंत त्यांना दिलासा मिळत आला आहे. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिलेले आहेत.
२०१४ सालच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर असलेल्या दोन गुन्हेगारी खटल्यांविषयीची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भातील याचिका याआधी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
सर न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश एस. के. कौल आणि न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या बेंचन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात नोटीस बजावली आहे.