शिवसेना आणि सचिन वाझे यांच्या कनेक्शनवर मनसेचे बोट
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले सचिन वाझे अंबानी यांच्या घरापुढील स्फोटक प्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण आता वाझे आणि शिवसेनेच्या कनेक्शनचा मुद्दा मनसेने मांडून काही सवाल उपस्थित केले आहेत.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चर्चेत आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या फोनवरुन संवाद झाल्याचा आरोप करत या प्रकऱणाचा तपास करण्याची मागणी केली. तसेच गाडी सापडली तेव्हा सचिन वाझे सगळ्यात आधी तिथे कसे पोहोतचले असा सवालही फडणवीस यांनी केला होता. आता या सगळ्या प्रकरणावरुन मनसेने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे आणि एक सवाल उपस्थित केला आहे, " श्री सचिन वाझे ह्यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
कोण आहेत सचिन वाझे?
सचिन वाझे हे असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहेत. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे मुख्य आहेत. जून २०२० मध्ये वाझे यांचे निलंबन मागे घेण्यात येऊन त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात आले होते. १९९०च्या दशकात वाझे यांची ठाण्यात बदली झाली. तेव्हा मुंबईत माफियांचा धुमाकूळ सुरू होता. वाझे यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केले. सचिन वाझे यांनी आतापर्यंत अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले आहे. पण २००२मध्ये मुंबईतील एका बॉस्बस्फोटाची चौकशी करत असताना ख्वाजा युनूस याला ताब्यात घेण्यात आले होते. पण या ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचा आरोप झाला आणि काही अधिकाऱ्यांवर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला त्यात सचिन वाझे हे सुद्धा होते. त्यानंतर याच प्रकरणा त्यांनी २००४मध्ये निलंबित करण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर महाविकास आघाडीचे राज्यात सरकार स्थापन झाल्यावर सचिन वाझे यांचे निलंबन रद्द झाले आणि त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यानंतर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीमचे नेतृत्व वाझे यांनीच केले. तर अर्णब गोस्वामींना अडचणीत आणणाऱ्या टीआरपी घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे.