मिलिंद देवरा, आधी काॅंग्रेस सोडा, मग अर्धेकच्चे ज्ञान पाजळा !!

Update: 2020-02-18 04:40 GMT

दिल्लीतील निवडणुका पार पडून अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, पण त्या निवडणुकांचं विश्लेषण करताना सुरू झालेला काॅंग्रेसमधील अंतर्गत कलह थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिल्ली सरकारच्या उत्पन्न वाढीवरून अरविंद केजरीवाल यांचं कौतुक करणार्यात मिलिंद देवरांना, आधी काॅंग्रेस सोडा आणि मग आपलं अर्धज्ञान पाजळा, असा सल्ला अजय माखन यांनी उघडपणे ट्विट करून दिला आहे.

काही माहीत नसलेल्या गोष्टी शेअर करतोय, असा उल्लेख करून मिलिंद देवरा यांनी केजरीवाल सरकार गेल्या पाच वर्षांत आर्थिकदृष्ट्या विवेकी निर्णय घेणारं ठरल्याबद्दल ट्विट करून कौतुक केलं होतं. काही महिन्यांपूर्वीच आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांनीही हीच अपेक्षा केली होती की सरकारांनी उत्पन्न व खर्चाच्या बाबतीत विवेकी असलं पाहिजे. देवरा यांना विशेष भावलेली गोष्ट ही की दिल्लीतील आप सरकारने पाच वर्षात आपलं उत्पन्न 30 हजारावरून दुप्पट करून 60 हजारांवर नेलं.

देवरा यांनी ट्विट करताना एक विडिओ सोबत जोडले, ज्यात केजरीवाल म्हणताहेत की मी व्यापाऱ्यांना सांगितलं, तुम्ही पुण्य कमावण्यासाठी मंदिरात दान करता. शाळा काढता. तुम्ही मला शंभर रुपये दिलेत, तर त्यात एक हजार मुलं शिकतील. व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मी उधळपट्टी कमी केली. भ्रष्टाचार संपवला आणि त्यामुळे काम देऊ शकलो.

अजय माखन यांना केजरीवाल यांचं कौतुक पसंत पडलेलं नाही. त्यांनी मिलिंद देवरा यांना सुनावलंय, बंधु, तुला पक्ष सोडायचाय. आधी तू ते कर. त्यानंतर, अर्धसत्याचा बोभाटा कर. अजय माखन यांनी सोबत माहिती दिलीय की दिल्ली सरकारचे उत्पन्न 97-98 मध्ये 4 हजार करोड होतं, ते कोंग्रेसच्या काळात 37 हजार करोड झालं. हा विकास दर 14.87 टक्के होता. त्याउलट, आप सरकारचा विकास दर 9.9 टक्के इतका आहे. मिलिंद देवरा यांनी माखन यांना प्रत्युत्तर दिलं की माझा शीला दिक्षित यांच्या कामगिरीवर अविश्वास नाही. ते आपलं काम. आपण दिक्षित यांनी केलेलं काम जारी लोकांपर्यंत नेलं असतं तरी दिल्लीत काॅंग्रेस सत्तेत आली असती.

माखन यांच्या पाठोपाठ अलका लांबा यांनीही मिलिंद देवरा यांना लक्ष्य केलंय. वडिलांच्या नावाचा वापर करून पक्षात येणं, बसल्या बसल्या तिकीट घेणं, काॅंग्रेस लाटेत मंत्री बनणं आणि आता पराभूत झाल्यावर पक्षाला शिव्या देणं. पक्षात आत किंवा बाहेर, त्यांनाच आवाज उठवण्याचा किंवा तिकीट-पदे मिळवण्याचा अधिकार हवा, जे प्रियंका गांधीप्रमाणे रस्त्यावर आंदोलन करतात, अशी प्रतिक्रिया अलका लांबा यांनी दिलीय. एकंदरीत, दिल्ली निवडणुकांनंतर सावरण्याऐवजी काॅंग्रेसमध्ये आपापसात सुंदोपसुंदी माजलेली दिसून येत आहे.

Similar News