महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठींबा, बंडखोराची उमेदवारी मागे

Update: 2019-10-07 13:46 GMT

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून आता महायुतीचे उमेदवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अखेर आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

https://youtu.be/Eonq1EmDoNo

महासंघाच्यावतीने कोथरूड मतदारसंघातून मयुरेश अरगडे आणि राहुल जोशी या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज (सोमवार) या दोघांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. याचबरोबर पुण्यातील कसबा मतदारसंघात महासंघाच्यावतीने महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे.

या अगोदर विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महासंघाने चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता. यानंतर चंद्रकांत पाटील आणि महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांमध्ये शनिवारी बैठक देखील पार पडली होती. बैठकीनंतर शनिवारी सायंकाळी महासंघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांतदादांना महासंघाच्यावतीने पाठिंबा देत असल्याचे पत्रकही जारी केले होते, मात्र राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी या पत्रकावर आक्षेप घेत, याबबत या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. तसेच, अद्याप महासंघाचा पाठिंबा जाहीर झाला नसल्याचंही म्हटलं होत.

“चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्या संघटनेचे प्रवक्ते आनंद दवे यांनी परस्पर ते पत्रक काढलं आहे. याबाबत पुन्हा उद्या बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तसंच परस्पर पत्रक काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात येईल,” असंही कुलकर्णी यांनी सांगितलं होतं.

Similar News