विधानसभा निवडणूक निकालानंतर ११ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे.शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आपापल्या मागण्यांवर अडून राहिले आहेत. तर ३-४ दिवसात सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीती देखील युतीला आहे.सत्तास्थापनेचा मार्ग सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात दाखल झाले.
यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल दीड तास चर्चा झाली. याआधी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे संघ नेमकी काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.