केळवे माहीम धरणाला गळती, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Update: 2022-01-09 04:58 GMT

पालघर : माहीम केळवा लघुपाटबंधारे योजनेवरील धरणाला भगदाड पडले आहे. यातून पाणी गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धरणाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या मुख्य पाणी सोडण्याच्या मुख्य भिंतीच्या बाजूला हे भगदाड पडले आहे आणि यातून गळती सुरू झाली आहे. धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. धरणातील पाणी हळूहळू कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एनडीआरएफच्या एका पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत धरणाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.

झांझरोळी परिसरातील या धरणाला भगदाड पडल्याचे समजताच स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. धरण परिसरातील काही गावातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. या गळतीमुळे काही गावांचा पाणीपुरवठासुद्धा बंद करण्यात आला आहे. पण या धरणाला एवढे मोठे भगदाड कसे पडले याचे कारण समजू शकलेले नाही. माहीम केळवे धरणाची गळती गंभीर असल्याने इथे प्रशासनाने तातडीने उपाययोजनांना सुरूवात केली आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक असावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. उपाययोजना व काळजी क्षेत्रीय कार्यालयामार्फत घेण्यात येत आहे, असी माहिती पालघरच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांना तातडीने या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे.

Similar News