गुजरातमधल्या राजकारणातलं मोठं नाव असलेल्या आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल (Hardik Patel) यांची राजकीय वाटचाल आता अडचणीत सापडली आहे.
मेहसाना दंगलप्रकरणी हार्दिकला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आज लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी हार्दिकला निवडणूक अर्ज दाखल करता आला नसल्याने यंदा निवडणूक लढवण्याची त्याची संधी हुकली आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections 2019) लढवण्याची हार्दिकची इच्छा आता अपूर्ण राहीली आहे.
प्रकरण काय आहे ?
२०१५ मध्ये मेहसाणा इथं दंगल भडकाविल्याचा आरोप हार्दिकवर ठेवण्यात आला होता. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार हार्दिक या खटल्यात दोषी सिद्ध झाला होता. याविरोधात त्यानं स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हार्दिकवर वेगवेगळ्या स्वरूपाचे १७ खटले सुरू आहेत.. जुलै २०१८ मध्ये न्यायालयानं हार्दिकला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सध्या हार्दिक जामीनावर बाहेर आहे.