भाजपचे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत असतानाच त्याबद्दल मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी जळगाव येथे केलं आहे. मुक्ताईनगर मतदार संघासाठी नाथाभाऊ सुचवतील त्या कुणाचेही नाव असू शकते असं महाजन यांनी म्हटलंय.
पत्रकारांनी मुक्ताईनगरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर महाजन यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं उत्तर दिलं असले तरी रोहिणी खडसे यांना तिकीट मिळण्याची चर्चा आहे. या पुढच्याच प्रश्नाला त्यांनी कुणाचेही नाव त्या मतदार संघासाठी फायनल होवू शकते, अगदी नाथाभाऊ सुचवतील त्या कुणाचेही नाव असू शकतं, असं स्पष्ट करत एकनाथ खडसे हे पुढचे उमेदवार नसतील असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे यावेळी नाथाभाऊंना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
नाथाभाऊंना तिकीट न मिळाल्यास लेवा पाटीदार समाज नाराज होणार असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, प्रत्येक निर्णयाने कुणीना कुणी नाराज होतच असतो. उद्या मला तिकीट मिळाले नाही तर माझा समाजही नाराज होईल, कुणाच्याही समाजाला त्यामुळे वाईट वाटेल, असं म्हणत एकनाथ खडसेंच्या उमेदवारी बाबत प्रतिक्रिया दिली आहे.