माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह

Update: 2020-08-10 09:45 GMT

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “मला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला आहे, त्यामुळे गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी विलगीकरणात जावे आणि स्वत:ची कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी ” असे आवाहन प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे केले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

देशात आतापर्यंत अनेक बड्या मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा या बड्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ६२ हजार ६४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात देशात जवळपास १ हजार ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबळींची संख्या ४४ हजार ३८६ एवढी झाली आहे.

देशात एका दिवसात कोरोनामुक्त रुग्णसंख्येचा उच्चांक

दिलासादायक बाब म्हणजे देशात एका दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा उच्चांक नोंदवला गेला आहे. तब्बल ५४ हजार ८५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. तर देशात सध्या ६ लाख ३४ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Similar News