“राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी आशयाचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे, पण ही केवळ अफवा आहे आणि विरोधकांनी ही अफवा पसरवली आहे” असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याउलट निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये गेलेले आमदार आता राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक असल्याचा गौप्यस्फोटही नवाब मलिक यांनी केला आहे.
“आमचे आमदार भाजपमध्ये जाणार नाहीयेत तर निवडणुकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत. पण यावर पक्षाचा अजून कोणताच निर्णय झालेला नाही. लवकरच त्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल,” अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे. यामध्ये काँग्रेसचेही काही आमदार परतीसाठी उत्सुक आहेत. पण त्यांचा निर्णय काँग्रेस घेईल असंही मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील घडामोडींनंतर भाजपचं टार्गेट महाराष्ट्र आहे अशी राजकीय चर्चा वारंवार सुरू असते. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांमधील अंतर्गत वादातून पडेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याधी केला आहे. तर दुसरीकडे आघाडीतील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही काही भाजप नेते करत असतात. पण आता राष्ट्रवादीने हा गौप्यस्फोट केल्याने ते आमदार कोण अशी चर्चाही सुरू झाली आहे.