राज्याच्या सत्ताकारणातील राजकीय नाट्याचा शेवटचा अंक आता सुरु झाला आहे. ‘महाविकासआघाडी’ने सत्तास्थापनेचा मुहुर्त साधलाय. अनेक राजकीय घडामोडींनंतर ही आघाडी उदयास आली. मात्र, त्याला प्रासंगिक निमित्त ठरलं ते अजित पवार यांचं. भाजपला पाठींबा देत देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीने अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असं वाटत असतानाच पुढच्या ७८ तासातच त्यांनी आपला राजीनामा देत पाठींबा काढून घेतला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही (devendra fadnavis) तोंडघशी पडून अल्पकाळातच मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं.
आज विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. आपल्या राजीनामा नाट्यानंतर अजित पवार(Ajit pawar) पहिल्यांदाच माध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट जाणवत होता. मी राष्ट्रवादीच आहे आणि कायम रहाणार आहे असं त्यांनी सांगितलं. विधीमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ खा. सुप्रिया सुळे(supriya sule) यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या बहिणीची गळाभेट घेताना अजित पवार भावूक झालेले दिसले.
गेल्या काही दिवसांचा विचार केला तर अजित पवारांची भूमिका संशयास्पद राहीलेली आहे. शिवसेना,(Shivsena) काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष ‘महाविकासआघाडी’च्या दिशेने वाटचाल करत असताना किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला. या कार्यक्रमाच्या पहिल्याच बैठकीत अजित पवार काहीसे नाराजीच्या सुरात बाहेर पडले. ‘मी बारामतीला चाललोय’ असं त्यांनी माध्यामांसमोर सांगितलं. त्यानंतर मुंबईत आणि दिल्लीत झालेल्या बैठकीतही ते उपस्थित होते. सर्व काही सुरळीत सुरू होतं. महाविकासआघाडीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली असताना अजित पवारांनी थेट भाजपला पाठींबा देऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकप्रकारचा भूकंपच आला होता.
हे सर्व पूर्वनियोजित होतं आणि शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी हे केलं अशा चर्चाही रंगल्या. मात्र, शपथ घेतल्यानंतर अजित पवार जे गायब झाले ते समोर आलेच नाहीत. यासंदर्भातलं संजय राऊत (Sanjay sarut) यांचं विधानही सूचक आहे. यात किती तथ्य आहे अजित पवारांनाच माहीत. मात्र, हे सगळं प्रकरण झाल्यानंतर अजित पवारांची देहबोली पूर्वीसारखी आत्मविश्वासपूर्ण दिसत नाहीत हे तितकंच खरं.