कोरोना वॉरियर्स वाऱ्यावर शासकीय महाविदयालय व रूग्णालयातील डॉक्टरांचा संपावर जाणार
कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करुन कोरोना वॉरियर्स म्हणून त्यांना गौरविण्यात आल्यानंतर अनेक वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित ठेवल्यानं ११ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय वैदयकिय महाविदयालयातील वैदयकिय अधिकारी एका दिवसाच्या संपावर जाणार आहेत. अस्थायी सेवेवरील वैदयकिय अधिका-यांची सेवा नियमित करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे.
तसेच त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी शासकीय वैदयकिय महाविदयालय व रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी यांनी १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत काळया फिती लावून काम सुरू केले आहे.याउपरही शासनाने दखल न घेतल्यास ११ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय वैदयकिय महाविदयालयातील वैदयकिय अधिकारी एका दिवसाच्या संपावर जातील असा इशारा वैदयकिय महाविदयालय वैदयकिय अधिकारी संघटना,महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्यातील १८ वैदयकिय महाविदयालय व रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी हे कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करत आहेत.कोरोना वॉरियर्स म्हणून त्यांना गौरविण्यातही आले.मात्र त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या तशाच प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.त्यांची सेवा १२० दिवसांचीच असल्याने रूगणालयातील पदे नियमित असून देखील त्यांना अदयापही सहावा वेतन आयोगच लागू आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करूनही त्यांच्या हातात काहीच पडत नाही.वैदयकिय अधिका-यांना कायम सेवेत सामावून त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी संघटनेने केली आहे.
राज्य सरकारकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला आहे.डिसेंबर २०२० मध्ये कायम करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांना नोव्हेंबर महिन्यात देण्यात आले होते.मात्र त्यावर अदयापही काहीही निर्णय झालेला नाही.मुख्यमंत्री उदधव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,वैदयकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडेही संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे.
आता १ जानेवारी ते ७ जानेवारी पर्यंत वैदयकिय अधिका-यांनी सरकारच्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ काळया फिती लावून काम करण्यास सुरूवात केली आहे.या आंदोलनाचीही दखल जर सरकारने घेतली नाही तर येत्या ११ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय वैदयकिय महाविदयालय व रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी हे एका दिवसाचा लाक्षणिक संप पुकारतील असा इशारा संघटनेने दिला आहे.