‘कर्जाऊ’ का होईना छत्रपतींची वाघनखं येणार महाराष्ट्रात !
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखं सरकार परत आणणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण ही वाघनखं कशी आणली जाणार आहेत? जाणून घेण्यासाठी वाचा....;
अफझलखानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत येणार आहेत. मात्र ही वाघनखं इथं कायमस्वरूपी ठेवण्यात येणार नसून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाकडून तीन वर्षासाठी कर्जाऊ देण्यात येणार आहेत. म्हणजेच राज्यात या वाघनखांचं प्रदर्शन केल्यानंतर राज्य सरकार तीन वर्षांनंतर ही वाघनखं इंग्लंडला परत करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वाज्वल्य इतिहासाची साक्ष असलेली ही वाघनखं महाराष्ट्रातील चार वस्तूसंग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. मुंबई, सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथे ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.
अशी आणली जाणार वाघनखं
ही वाघनखं लंडनहून सुरक्षित आणण्यासाठी ११ जणांची एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सुरक्षेसंदर्भात सर्व उपाययोजना सुचवणार आहे. लंडनहून ही वाघनखे कशी आणायची याचा ही प्लान ही समिती देणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. भारतीय इतिहासाच्या दृष्टीकोनातून वाघनखं हे एक महत्वाचं शस्त्र आहे. युद्धनितीच्या दृष्टीकोनातून वाघनखांचा अभ्यास केला जातो. ही वाघनखं भारतात आल्यानंतर येथील अभ्यासकांनाही इतिहासाचं हे पान जवळून अभ्यासता येणार आहे.