उत्तर महाराष्ट्रातील भाजपला ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच धक्का बसलेला आहे. जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांना उमेदवारी न दिल्यानं त्यांच्या समर्थकांची आणि आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन पुन्हा रद्द केल्याची नाराजी आधीच भाजपला त्रासदायक ठरू लागलेली आहे. अशा परिस्थितीत धुळ्याचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीही अखेर पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षविरोधी भूमिका आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यावर सातत्याने ते टीका करत होते. अखेर त्यांनी आज (सोमवार) पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तर आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला आहे.