संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे 30 आक्टोबर रोजी पंढरपुरात भूमिपूजन
पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या 30 आक्टोबर रोजी पंढरपुरात सकाळी 11 वाजता होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संत
मंडळींच्या हस्ते या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे,अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी लाखो भाविक पायी आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगती पथावर आहे. कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रम घेता
आला नाही. त्यानंतर आता येत्या 30 आक्टोबर रोजी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर या कार्यक्रमाचे आजोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी दहा
हजार लोकांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्रमुख संत मंडळींना निमंत्रण देण्यात आले
असून त्यांच्या हस्ते पालखीमार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या
जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांनी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. याबाबतची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी आज येथे दिली. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे आदी उपस्थित होते.