‘देशातील सर्व सीमा आपल्या ताब्यात आहेत. तुम्ही आधीच्या सरकारला प्रश्न विचारायचे की सीमा सील आहेत तर हे सगळं येतं कुठून. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ही द्यावं लागणार आहे. हल्ल्यासाठी लागणारं आरडीएक्स आलं कुठून..’ राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवलाय.
नरेंद्र मोदींना हवेत वाटलं की नवाज शरीफचा वाढदिवस आहे, केक खायला जायला हवं, आणि हवेतच विमान वळवलं. पाकिस्तानला गेले, त्यानंतर लगेच पठाणकोट, उरी, पुलवामा हल्ले झाले. हेच मोदी मनमोहन सिंह यांना बोलत होते, लव्ह लेटर लिखना बंद करो. तेच मोदी पाकिस्तान सोबत मैत्री करतात याचा सवाल विचारायला नको का असं म्हणच नरेंद्र मोदी यांच्यावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केलीय.
पुलवामा हल्ल्यानंतर रात्री एअर स्ट्राइक केला. त्यानंतर अमित शहा यांनी 250 अतिरेकी मारले गेल्याचा आकडा जाहीर केला. तुम्ही गेला होतात का विमानात को-पायलट म्हणून. तुम्ही निवडणूकीसाठी हा मुद्दा वापरताय आणि तुम्हाला प्रश्न विचारलं की देशद्रोही... ही देशद्रोही टर्म पण हिटलर कडून आलेय. अच्छे दिन ची घोषणा रूझवेल्ट कडून आलीय. हे रात्री पुस्तकं वाचत असणार आणि इकडून तिकडून उचलतात.
गोरक्षा सारख्या मुद्द्यांवर हे लोकांना टार्गेट करतात. सगळेच लोकं जर गायी कापत असतील तर दूध कोण देतंय. उगीच लोकांमध्ये दुही परसवून मुळ मुद्द्यांपासून दूर नेण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच काही जैन मित्र बीफ च्या एक्स्पोर्टचं काम करतात. मग हे माणसांना मारायचं काम कशासाठी चाललंय, असा झणझणीत सवाल राज ठाकरे यांनी केला.