नुकताच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पुण्यातील भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संवादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची चर्चा देखील महाराष्ट्रात झाली. या कार्यक्रमाचं सुत्रसंचान केलं अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी. या कार्यक्रमात सुबोध भावे राहुल गांधी यांना संवाद साधताना “अनेकजण मी राहुल गांधींसारखा दिसतो असे म्हणतात. मला तुमच्यावर चरित्रपट सुद्धा करायचा आहे.” या वेळी राहुल यांनी हजरजबाबीपणा दाखवत सुबोध भावे यांना तुम्ही माझ्यासारखे दिसत नाही तर ‘मी तुमच्या सारखा दिसतो’ अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियांच्या माध्यमांवर बातम्या देखील झळकल्या. मात्र, या कार्य़क्रमानंतर सुबोध भावेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कारण सुबोध भावे हे शिवसेनेचे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहे.
सुबोध भावे यांना सोशल मीडियावर ट्रोलिंग केल्यानंतर सुबोध भावेने फेसबुकवरुन आपली भूमिका मांडली आहे. ते आपली भूमिका मांडताना म्हणतात...
मी रंगभूमीचा कलाकार आहे.रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते,सर्वांशी आदरानी आणि प्रेमानी वागायला शिकवते.
रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही.
माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत.
मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे.
माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर हि जबाबदारी देणाऱ्या उध्दव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे.
आजपर्यंत मी मोहनजी भागवत,शरद पवार साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब,राज साहेब,रामदासजी आठवले या सर्वांना अतिशय प्रेमानी भेटलो आणि त्यांच्या विषयी माझ्या मनामध्ये आदर आहे.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांना ही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने(जे माझ काम आहे) मी त्याच आदर आणि प्रेमानी भेटलो.त्यांना भेटून आनंद झाला.त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
ता क
आता मुद्दा त्यांच्यावर चरित्रपट करायचा!
कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला.
(आणि त्यांचं काम मी करूच शकतो कारण कोणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे मी भारतरत्न ए. पी.जे.अब्दुल कलाम सर, सेरेना विल्यम्स यांच्या भूमिका करू शकतो तर राहुल गांधींची का नाही?)
कळावे
लोभ असावा
आपला
सुबोध भावे