भारतीय समाज बहुआयामी व अनेक जिनसी आहे. कोणताही धर्म किंवा जात घेतली तरी त्यांच्या प्रथा, परंपरा, रूढी या घट्ट आणि कट्टर बनलेल्या दिसतात. कालौघात त्यात अनेक सुधारणा झाल्या. परंतू सेक्ससारख्या विषयात भारतीय समाज आजही पुरोगामी भूमिका स्वीकारताना दिसत नाही. नव्या पिढीतील लोक जरी मुक्त लैंगिक अधिकाराची भाषा करत असले तरी त्या स्वातंत्र्यात अन स्वैराचारात जी पुसटशी रेषा आहे ती समजून घेणं अजून तरी जमलेलं नाही. कारण मुक्त सेक्स रिलेशन ठेवणारे लोक लग्न करताना घरचे म्हणतील तसं, किंवा मुलगी (हे एक विशेष. मुलाने पुरुष म्हणून मुक्त सेक्स करणं अगदी समाजमान्य आहे. स्वत:ला प्रगत मानणारेही यात मागे नाही.) व्हर्जिन असली पाहिजे ही डिमांड.
भारतीय समाज मुळातच दुटप्पी व सोयीच्या पर्यायांचा विचार करणारा समाज आहे. मुक्त लैंगिक स्वातंत्र्याचा विचार उच्च मध्यम वर्ग व श्रीमंत वर्ग करतो. तेही सोयीने. परंतु हे स्वातंत्र्य मध्यमवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांना घेऊन चालत नाही. कारण, इथं लग्नाच्या बाजारात अशा स्वातंत्र्याला कलंक मानलं जातं. आपल्याकडे निकोप दृष्टीने याकडे पाहिलं जात नाही हे आपलं सर्वात मोठं दुर्दैव. सेक्स ही लपून करायची गोष्ट असते. त्याबाबत उघड कुणी बोलू नये, असे अलिखित नियम आपल्याकडे गुमान पाळले जातात. त्याला ‘मर्यादा’ असा गुळगुळीत शब्द वापरला जातो. ‘चारित्र्य’ ही एक अमूर्त गोष्ट आपल्याकडे फार फेमस आहे. तरीही भारतात मुक्त सेक्स कॉमन होतो आहे. गाव असो वा शहर. पॉर्न विडीयो पाहणाऱ्यांची संख्या लाखात आहे.
सोबतचा व्हिडीयो पाहिल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहिले. (कारण आपल्याकडे प्रश्नांना शांत बसा असा शाप दिलेला असतो.) मुळात वर्गात हा प्रकार म्हणजे रॅगिंग आहे का? कारण ती मुलगी हसत का असेना व्हिडीओला नकार देतीय. सारी मुलं तिचा व्हिडीयो बनवत आहेत, अन तिचे अंगवस्त्र काढण्यास भाग पाडत आहेत. हा व्हिडीयो त्यापैकीच कुणीतरी नेटवर टाकलेला असणार आहे. ही कोणती मानसिकता म्हणता येईल? त्यानंतर त्या मुलीची काय अवस्था झाली असेल? मुलीचं इतकं मुक्त असणं खरंच तिला मिळालेलं स्वातंत्र्य आहे का? याला लैंगिक शिक्षणाशी कसं जोडता येईल याचा विचार मी करत होतो. तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ‘मुलीच्या योनीला पाहण्यासाठी हा चाललेला अट्टाहास विकृती दर्शवतो. अशा वयोगटात जेव्हा मुलं तारुण्याच्या थ्रीलभरल्या टप्प्यात येतात तेव्हा लैंगिक आकर्षण हा सर्वात प्रभावी मुद्दा ठरतो. (भिन्नलिंगी किंवा समलिंगी ) (शेवटी माणूस हा प्राणी आहे. नियमन केलं तरी नैसर्गिक गोष्टी रोखता येत नाहीत.) या वया आधीच मुलांना शास्त्रीय लैंगिक शिक्षण मिळालं तर अशा विकृत मनोवृत्तीतून जाण्याचा धोका बऱ्याच अंशी टाळता येईल. इथं शास्त्रीय शब्द फार विचारपूर्वक वापरला आहे.
या व्हिडीयोत कोणत्याही मुलग्याने पँट काढून आपले लिंग दाखवलेले नाही. असं का असावं? मुलींना इच्छा नसेल का त्यांचं लिंग पाहण्याची? की हा हक्क केवळ पुरुषांना आहे? ही पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता लैंगिक शिक्षणातील एक अडसर आहे. त्यामुळे आपल्याकडे अगदी लहानपणापासून मुलींची कामे-खेळ, मुलांची कामे–खेळ अशी सरळ सरळ विभागणी होते. मुलांनी मुलींचे खेळ खेळू नयेत असा हाग्या दम दिला जातो. अशा मनोवृत्तीत लैंगिक शिक्षण तग धरू शकत नाही.
मुलांना लैंगिक शिक्षण दिलं तर माहित नसलेलं माहित करून द्यायचं व त्यांना बिघडवायचं का? हा एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो. याचं समाधानकारक उत्तर शोधत शोधत लैंगिक शिक्षणाची वाट सोप्पी करावी लागेल. शाळा कॉलेजातून मुलामुलींना मिश्र पद्धतीने राहण्याचं, मैत्रीपूर्ण वातावरणात शिकण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याला दुसरी बाजू ही आहेच, परंतु निकोप मैत्रीचं नवीन वर्जन हाती द्यायला हरकत नाही. पाश्चात्य लोक करतात म्हणून आपणही स्वातंत्र्य घेऊ असं म्हणून हा आंधळा खेळ रचण्यात हशील नाही. उलट निकोप नात्यांची नवीन software विकसित करायला हवीत. ग्रामीण काय अन शहरी काय, मानसिकता फार वेगळी नसते. समाजाच्या चौकटी थोड्या मोठ्या करून नवीन स्वीकारायला हवं, पण हे करताना स्वातंत्र्य व स्वैराचार यातली अंधुक रेषा पुसली जाऊ नये याचंही भान आपल्याला ठेवावं लागेल.