व्यंग असलेल्या व्यक्तींनी लैंगिक संबंध ठेवणे हा विचार देखील समाजात चर्चिला जात नाही. पण व्यंग असलेल्यांना देखील लैंगिक क्रीडा ही तेवढीच महत्वाची वाटते, हा विचारही अनेक जण करू शकत नाहीत. हे सगळे गैरसमजांचे परिणाम असल्याचं आपल्याला जाणवतं.
नवीन लग्न होऊन घरात आलेली मीना तिच्याच तंद्रीत होती. नवीन घर, नवीन लोक या सगळ्यांशी तिला आता जुळवून घ्यायचं होतं. तसं कुटुंब चौकोनीच होतं. सासू, सासरे, नणंद आणि नवरा. सासू-सासऱ्यांची तिला फार काळजी वाटत नव्हती कारण लग्नाआधीच ते दोघेही तिच्याशी मनमोकळे बोलले होते. घरातल्या वातावरणाची तिला जाणीव करून दिली होती. तिच्या इच्छाअपेक्षांबद्दल आस्थेने विचारलं होतं. त्याच वेळी सासू सासरे प्रेमळ आहेत, ते मीनाला कळालं होतं. तिला खरी काळजी वाटत होती ती तिच्या नणंदेची. लग्नाआधीच सासू-सासऱ्यांनी मीना आणि तिच्या घरच्यांना तिच्या नणंदेची कल्पना दिली होती. तिची नणंद काहीशी मतिमंद होती, असे तिच्या सासू-सासऱ्यांनी सांगितले होते. साधारण घरात वाढलेली मीना या नणंदेशी कसं जमवून घेणार, हे तिचं तिलाच कळत नव्हतं. त्यामुळेच नवीन घरात वावरताना तिला जरा काळजी वाटत होती. त्यात लग्नाआधीच नणंदेचं लग्न करणार नाही, असं स्पष्ट शब्दांत तिच्या सासू-सासऱ्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मीना जरा जास्तच धास्तावली होती.
जसजशी ती घरात रुळायला लागली, तसतसं तिच्या लक्षात आलं की आपली नणंद बऱ्याच गोष्टी करू शकते. इतर नातेवाइकांकडे चोकशी केली तेव्हा तिला कळाले की, सुरवातीला आपली नणंद नीट उभीही राहू शकत नव्हती. मात्र आता ती तिची कामे धीम्या गतीने का होईना, पण करत होती. चालताना तिला जरा त्रास होत होता. सामान्य लोकांप्रमाणे ती चालू शकत नव्हती, पण आधाराशिवाय चालणं तिला आता शक्य होतं. मीना जे काही बोलायची, ते आता बरचसं ती समजू शकत होती. अगदी टोमणेही आणि कुजकं बोलणेही. हे सर्व पाहिल्यावर आपल्या नणंदेला हे लोक मतिमंद का म्हणतात, हे मीनाला समजत नव्हते. असं असूनही मीना शांतच बसली. कुणाला आवडेल, न आवडेल म्हणून तिने काहीही न बोलणेच पसंत केले. पुढे मीनाच्या पायाखालची जमीनच सरकली, जेव्हा तिला कळाले की, आपल्या २२ वर्षांच्या नणंदेला आपल्या आणि आपल्या नवऱ्यातलं नातं कसं खुलतं, हे अतिशय चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. मीनाचा नवरा जवळच असलेल्या दुसऱ्या गावी नोकरी करायचा.
नवीन लग्न झालेलं असलं तरी केवळ शनिवार-रविवार तो घरी येत असत. नोकरीच्या ठिकाणी घेतलेल्या घराचा ताबा मिळण्यास अवकाश होता, म्हणून मीना काही दिवस गावीच राहील, असं त्यांचं ठरलं होतं. ज्या दिवशी मीनाचा नवरा घरी येणार, त्या दिवशी तिची नणंद तिला चिडवत असे. हे मीनाने अनेकदा नवऱ्याच्या कानावर घातले. ती म्हणाली, “अहो, याचा अर्थ तिला कळतं हो सर्व! तुम्ही उगीच समजता की तिला यातलं काहीही कळत नाही.” तिचा नवरा मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असे. “आता लवकर गोड बातमी द्या वहिनी,” असं जेव्हा तिची नणंद म्हणाली, तेव्हा तिची खात्रीच झाली की नवरा बायकोमधल्या सेक्स लाइफची कल्पना तिच्या नणंदेला पुरेपूर होती. असं जर असेल तर हिचं लग्न का करू नये? असा प्रश्न मीनाला सतत सतावत राहिला. एका रात्री जेव्हा मीना आपल्या खोलीत झोपली होती, तेव्हा तिला अर्ध्या रात्री आपली नणंद आपल्याशेजारी झोपली आहे, असं जाणवलं. तिचा हात मीनाच्या हातावरून फिरत होता. तो स्पर्श मीनाला बिलकुल आवडला नाही. तिचा हात झिडकारून ती पुढच्या रूममध्ये धावत आली. त्यावेळी तिच्या मनाला आणि मेंदूलाही झिणझिण्या आल्या होत्या. झालेली घटना तिने कोणालाही सांगितली नाही; मात्र नवऱ्याच्या मागे लागून ती दोन दिवसांतच त्याच्यासोबत गेली. झालेल्या घटनेचा मात्र उच्चारही करणे तिने टाळलं.
ज्या प्रमाणे मीनाने नणंदेच्या गरजा घरातील बाकी लोकांपर्यंत न पोहोचवून एक प्रकारे चूक केली; त्या प्रमाणे अनेक लोक आजही चुका करत आहेत. मीनाच्या सासू सासऱ्यांनी गैरसमज करून घेतला की तिच्या नणंदेला लैंगिक जाणिवाच नाहीत. असा गैरसमज आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर आहे. मुळातच लैंगिक आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते. त्यातच विकलांग आणि मतीमंद यांच्या लैंगिक आयुष्याबद्दल कोण बोलणार?
आकर्षक दिसणे हे व्यंग असलेल्यांच्या दृष्टीने महत्वाचे नसेलही; पण व्यंग असलेली माणसे ही सामान्य माणसांपेक्षा वेगळी असतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्यामधे वेगळ्या संस्कृतीची माणसे असतात आणि समाजाकडून त्यांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या लैंगिक इच्छेशी संलग्न असतात. शारीरिक व्यंगाकडे समाजात पहिल्यापासून नकारार्थी दृष्टीकोनातून बघितले जाते. खरे तर त्या अवस्थेमध्ये देखील ती व्यक्ती माणूसच असते. मग ती कोणत्याही लिंगाची असो वा जातीची. त्यात काहिही फरक पडत नाही.
पण अशांसाठी व्यंग हे शब्द मनातून काढलेच जात नाहीत. म्हणूनच व्यंग असलेल्या व्यक्तींना जगाच्या दृष्टीने खरे तर वेडेच ठरविले जाते. अशा प्रतिक्रियांमुळे व्यंग असलेली व्यक्ती अशा लोकांचा तिरस्कारच करते. मैत्रीपूर्ण दृष्टीकोण शिल्लकच राहात नाही. व्यंग असलेल्या माणसाला आलेला राग आणि नैराश्य हा त्या वातावरणाचा परिणाम असतो. व्यंग असलेल्या व्यक्तींची लैंगिक संबंधाची इच्छाच गेलेली असते, असे समजले जाते आणि ज्यांना तशी इच्छा राहिलेली असते, अशांना "आजारी" समजले जाते. असे गैरसमज आजही आहेत आणि ते पसरवलेही जातात.
लैंगिक संबंधाच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या अडचणी येत असतात. त्याचप्रमाणे व्यंग असलेल्या लोकांनाही काही अडचणी येतात. त्या अडचणी त्यांच्या व्यंगानुसार बदलतात. साधारणपणे शारीरिक हालचाल न करता येणे, दृष्टीदोष व श्रवणदोष अशी व्यंगे आढळतात. यामध्ये सुध्दा असलेल्या व्यंगामध्ये कमी जास्त प्रमाण असणे आणि शारीरिक अवस्था यामुळे या संकल्पनेत क्लिष्टपणा निर्माण झालेला आहे. शारीरिक व्यंगानुसार प्रत्येक व्यक्तीची हालचाल करण्याची शारीरिक क्षमता बदलत असते. उदा. चाकाची खुर्ची वापरणार्या व्यक्तींना अर्धांगवायू झालेला असतो. खरे तर अशा अनेक व्यक्तींना अर्धांगवायू झालेलाही नसतो, पण इतर काही कारणांमुळे त्यांना खुर्ची वापरावी लागते. अशा अनेक गोष्टींचा विचार व्यंग असलेल्या व्यक्तींच्या लैंगिक संबंधाबाबत करता येईल.
ज्यांना दृष्टीदोष आणि श्रवणदोष आहे, अशा व्यक्तींना लैंगिक संबंधाची गरज आणि इच्छा व्यक्त करण्यास अडथळा येतोच; पण दोन व्यक्तींची भेट घडविणे देखील दुरापास्त असते. डोळ्यांची भाषा ही लैंगिक संबंधांमधील पहिली पायरी समजली जाते. त्यामुळे अंध आणि ज्यांना कमी दिसते, अशांसाठी ही क्रिया वापरणे अवघड असते. अशा व्यक्तींच्या बाबतीत ही सुरवात कशी होते? यामध्ये इतर गोष्टी उदा. शाब्दीक देवाण घेवाण, हाताला स्पर्श करणे इत्यादी गोष्टींचा विचार करता येतो.
शाब्दीक पातळीवर एक पातळी गाठल्यानंतर लैंगिक संबंधांविषयी पुढाकार घेता येतो. त्याचप्रमाणे कर्णबधीर अथवा ज्यांना कमी ऐकू येते, अशांना सुरवातीची पातळी गाठणे अवघड पडते. यामध्ये अनेक व्यक्ती खुणेची भाषा वापरून प्राथमिक संबंध प्रस्थापित करतात. अनेक बहिर्या लोकांना ओठांची भाषा लगेच उमजते. फक्त या प्रकारात समोरच्या माणसांचे तोंड संबंध बोलणे होईपर्यंत त्या माणसाकडे हवे. अशा पद्धतीने संबंध प्रस्थापित करताना ज्यांना अडचणी येतात, त्यांना लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यावर देखील परिणाम होतो. खरे तर खुणेची भाषा सर्वांना समजेल, असे नाही. ज्याला ऐकू येते, अशा व्यक्तीला जर ऐकू न येणारे मित्र, नातेवाईक अथवा प्रेमिक वगैरे असेल तर त्यांना खुणेची भाषा समजते. त्यामुळे त्यांना संबंध प्रस्थापित करता येतात. पण अशांच्या बाबतीत सुरवातीला एकमेकांना समजून घेणे, अतिशय अवघड असते- नव्हे, कधी कधी अशक्य असते. दोन कर्णबधीर अथवा कमी ऐकू येणार्या व्यक्तींच्या बाबतीत लैंगिक संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने पावले टाकणे सोपे पडते कारण ते खाजगीमध्ये विचारांची देवाणघेवाण करू शकतात. पण बहिर्या माणसाला जर एखाद्या ऐकू येणार्या माणसाशी संबंध प्रस्थापित करायचे असतील आणि त्याला खुणेची भाषा समजत नसेल तर अशी खुणेची भाषा समजणारा मध्यस्थ हवा. लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थ असणे, ही कल्पनाच करवत नाही. कारण त्यामुळे खाजगीपणा संपतो आणि लैंगिक विषयावर बोलणे अवघड होऊन जाते. त्यामुळे अशा अनेक व्यक्तींना खुणांची भाषा माहित नसते आणि त्यामुळे त्यांना लैंगिक संबंध प्रस्थापित करता येणे कठीण आहे.
हालचालींचे व्यंग असलेल्या व्यक्तींमध्ये देखील अनेक ग्रुप असतात. ज्यांना स्नायु, हाडे अथवा सांध्याचे आजार असतात, असे लोक कुबड्या वापरतात तर ज्यांचे पाय अथवा हात कापलेले असतात अथवा जन्मापासूनच नसतात, त्यांच्या बाबतीत कृत्रिम अवयव वापरले जातात. अवयव काढून टाकल्यामुळे अथवा स्नायूंचे अथवा हाडांचे आजार अथवा मज्जारज्जूंच्या आजारामुळे होणार्या अर्धांगवायुसारख्या प्रकारांमध्ये चाकाच्या खुर्चीचा वापर केला जातो. खुर्चीचा वापर करणार्यांमुळे अनेक प्रकारचे शारेरिक अडचणी दिसून येतात.
ज्या व्यक्तींना शारीरिक व्याधी मोठ्या प्रामाणावर नसते, अशा व्यक्तींना लैंगिक संबंध ठेवताना आरामदायक स्थितीमध्ये ती करता येते. शारीरिक व्यंग असलेल्या आपल्या जोडीदाराच्या परिस्थितीवर दुसर्या जोडीदाराचे (त्याच्या शारीरिक व्यंगाचा विचार करावा लागतो) शारीरिक अडचणीचे प्रमाण अवलंबून असते. शारीरिक व्याधी नसलेली व्यक्ती जेव्हा शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध ठेवते. तेव्हा स्वत: पाहिजे तशी हालचाल करू शकते अथवा आपल्या जोडीदाराला हलवू शकते आणि त्यामुळे समाधानधारक स्थिती धारण करू शकते.
जसजशी एखादी व्यक्ती आपल्या अवयवांच्या जास्त जवळ जवळ जाते, (आपल्या अवयवांची ओळख करून घेते,) तेव्हा त्या व्यक्तीला शरीराच्या निरनिराळ्या भागांना उत्तेजना दिल्यास त्यांना लैंगिक उत्तेजना मिळते. अर्धांगवायू झालेल्या अनेक व्यक्तींना मान, कान, दंड, स्तनाग्रे अथवा काही नाजूक जागी स्पर्श केल्यास लैंगिक उत्तेजना मिळते, पण त्यातून लैंगिक तृप्ती मिळत नाही, अशा काही व्यक्तींच्या मते त्यांच्या लैंगिक संवेदना त्याच्या मेंदूशी निगडित झालेल्या असतात आणि त्यांना शारीरिक तृप्तीऐवजी मानसिक तृप्ती मिळते.
श्रवणदोष, दृष्टीदोष असणार्यांना प्रथम व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करणे जसे अडचणीचे वाटते, तसे शारीरिक व्यंगाच्या व्यक्तींना वाटत नाही. व्यवस्थितपणे लैंगिक क्रीडा करणे हे खूप अडचणीचे वाटते. लैंगिक संबंध ठेवण्याआधी मानसिक संबंध प्रस्थापित करणे, आपण करणार असलेल्या क्रीडेविषयी बोलणे हे व्यंग असलेल्यांना खूप अवघड जाते. त्यामुळे त्यांना आपण काय बोलायचे, हे आधी ठरवावे लागते. त्यामुळे खरी लैंगिक क्रीडा करण्याआधी उत्कंठा वाटून राहात नाही.
शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंधाविषयी असे बोलणे कधी कधी अपमानास्पद वाटते. पण एकदा अशा जोडप्यांना एकमेकांबद्दल विश्वास वाटू लागला आणि संवाद वाढविता आला तर अशा प्रकारचे बोलणे अपमानास्पद वाटत नाही, उलट उघडपणे अशा विषयांवर ते चर्चा करू शकतात.
असे जरी असले तरी घरच्यांनी व्यंग असलेल्या व्यक्तीबद्दल जाणून घेतले पाहिजे. लैंगिक जीवनात त्याला कुठल्या अडचणी संभवतील व त्यावर काय तोडगा काढता येईल, हे डॉक्टर व घरातील इतर मंडळींच्या चर्चेतून शोधले पाहिजे. व्यंग असलेल्या व्यक्ती या माणूसच असतात त्यामुळे त्यांच्या भावभावनांचाही विचार करायला हवा.
- प्रियदर्शिनी हिंगे