काही वर्षांपूर्वी एक लिंगभाव संवेदनी फेमिनिस्ट पोस्टर पाहिलं होतं. एक छोटा मुलगा आणि एक छोटी मुलगी एकमेकांची चड्डी ओढून 'आत' बघतायत. आणि मुलगी म्हणते की, येस्स्स, आत्ता मला कळलं की आपल्या रोजगारात फरक का आहे ते !
हे पोस्टर व्हायरल व्हायला हवं होतं. एकाच कामासाठी पुरुषाला आणि स्त्रीला मिळणाऱ्या रोजगारात अकारण तफावत का असावी असा प्रश्न विचारणारे ते पोस्टर आलं नि गेलं. ते काही कुठं व्हायरल झालं नाही.
आता सध्या एक दुसराच व्हिडिओ व्हायरल होतो आहे. एकमेकांच्या चड्डीतील अवयवांबद्दलचं कुतूहल मुलांच्या वाढत्या वयातही टिकून असतं. चड्ड्या ओढून ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायचे असतं. खिक करून गुंठीत गुंठीत हसायचं असतं. असं वाटत असतं. पण ते सहसा केलं जातं नाही. केलं तरी त्याचा फोटो कोणी काढत नाही. व्हिडीओ कोणी करत नाही. केला तरी तो कुणी कोणाला पाठवत नाही.
पण आता काळ बदलला आहे. याचे कारण काळ नाही तर आपली स्मार्ट मुले मठ्ठ होऊन मोठी होत आहेत. शरीराशी नातंच जुळलेलं नाहीये. बाकी लहानपणापासून स्मार्टगिरी करत इंटरनेटवर जाऊन मनुष्य पेशींच्या मायटोकॉन्ड्रियाल लेव्हलला जाऊन सेल स्ट्रक्चर, मायक्रो विलो केमिस्ट्री माहीत असते. लेटेस्ट ब्रेन सर्जरी ठाऊक असते. परंतु 'तो' दहावीतला धडा पूर्ण ऑप्शनला टाकलेला असतो. शिक्षकांनीही. त्या धड्यातही काही राम नाहीच ते सोडा. पण किमान माहिती तरी आहे. पोर्नोग्राफी चालू असतेच दुसऱ्या बाजूला. मासिक पाळी, सेक्स, गर्भधारणा, गर्भपात, डिलिव्हरी याबद्दल माहिती आणि संवेदना अगदी प्राथमिक अवस्थेत ठेवूनच आज मोठं व्हावं लागतं. वीर्य, ब्रह्मचर्य, शीघ्रपतन, वाकडे लिंग, हस्तमैथुन इत्यादींबद्दल केवळ निखळ शास्त्रीय माहिती मिळाली की या मुलांचं समाधान होतं. ज्यांना हेही नाही मिळत आणि याविषयी काही शंका आली तर कोणी भोंदू डॉक्टर बाबा आहे जो अमुक लॉजवर तिसऱ्या गुरुवारी 302 मध्ये येतो, त्याच्याकडे जायचे हे माहीत. किंवा गुगल करायचं. तिथंही काही नाही मिळालं की एकमेकांच्या चड्ड्या ओढायच्या. मनाची पूर्ण बुद्धीहीन अवस्था करून घेऊन.
ज्या शरीराच्या माध्यमातून दुसऱ्या शरीराशी नातं जोडायचं असतं, त्या शरीराच्या आतमध्ये मन असतं. स्वशरीराचा आणि म्हणून दुसऱ्याच्या शरीराचा सन्मान फक्त मनानेच करता येतो. या मनाचे 'शरीर शिक्षण' जे व्हायलाच हवे आहे ते होतच नाहीये. प्रगल्भता येतच नाही. यासाठी मोठी माणसं काही करत नाहीत. मग असे व्हिडीओज करून, फोटो बिटो पाठवून व्हायरल करत आयुष्य कंठायचं. त्यातच मजा मानायची. बरे यात एक्झिबिशनिझम नावाची एक मानसिक विकृती आहे असंही नाही. वय वाढलं, शरीर वाढलं पण बालिश बुद्धीहीन कुतूहल कायमच राहिलं. इतक्या प्राथमिक अवस्थेतील मन आणि (शरीरही)पुढं जाऊन नातं कसं निभावणार? खरं तर लैंगिकतेचे किती तरी मनोरम आविष्कार असतात त्यांच्याकडे पूर्ण पाठ फिरवायची. मुलीच्या चड्डीतील अवयव (जे नीट व्यवस्थित तरी पाहावेत तर तेही नाही!) पाहायचे, खिक खिक करतच पाहायचे. यात तिचा abuse आहे हेही कळत नाही. इतका सारा अडाणीपणा ओतप्रोत भरलेला विडिओ आहे हा. आणि आपण मोठी माणसे, पालक, शिक्षक या सर्व घटितांकडे आ वासून पाहत राहायचं. कसं व्हायचं या मुलांचं, म्हणून सुस्कारे सोडायचे.
आपली आधुनिक स्मार्ट मुले अतिशय अप्रगल्भ आणि मठ्ठ निपजत आहेत याचे हा व्हिडिओ म्हणजे लक्षण आहे. आपण मोठयांनी सर्वांनी अगदी अर्जंटली खडखडून जागं होण्यासाठी ती एक मोठ्यानं वाजलेली घंटा आहे.