केंद्रातील काही मंत्री सातत्याने संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत पण आम्ही ते होऊ देणार नाही - सुप्रिया सुळे
आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटिल, फौजिया खान इतरही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी फौजिया खान आणि पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संविधानाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे आंदोलन राज्यातील वाडीवस्त्यांपर्यंत पोहोचविले आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
त्यांनी या कार्यक्रमावेळी भाषण दिले ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, "बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही संविधान स्तंभ उभारले आहेत. समाजात अस्वस्थता आहे, तेढ वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा वेळी हे संविधान स्तंभ, 'आम्ही भारताचे नागरिक' एक असून देशात सामाजिक सौहार्द आणि सलोखा राखण्यासाठी सदैव कटीबद्ध आहोत. राजधानी दिल्लीमध्ये संविधानाची प्रत जाळण्याचे पाप काही शक्तींनी केले होते. देशाचे प्रधानमंत्री त्यावेळी दिल्लीत असून देखील त्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आजही सतत संविधानाच्या विरोधात काही ना काही सुरु असते पण ते यावर काहीच बोलत नाहीत."
पुढे त्या म्हणाल्या की, " केंद्रातील काही मंत्री सातत्याने संविधान बदलण्याची भाषा करीत असतात. याचाच असर्थ सत्तेत असणाऱ्यांचा संविधान बदलावे असा विचार आहे. तो त्यांच्या वागण्यातून आणि कृतीतून दिसत असतो. परंतु संविधान आमच्या जगण्याचा आणि वागण्याचा विचार आहे. आम्ही ते होऊ देणार नाही."