अभिनेत्री सारा श्रवण हिने पुण्यातील वानवडी येथील पोलिस चौकीत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला नुकतेच पोलिसांच्या हवाली केले आहे. सारासोबत एका सुभाष यादव नावाच्या इसमाने तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती ज्यामुळे साराने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. गेल्या दोन वर्षांपासून एका मराठी चित्रपटाचे राज्यातील विविध भागात चित्रीकरण सुरू होते. याच दरम्यान सुभाष यादवने संबंधित अभिनेत्रीशी लगट करण्याच्या उद्देशाने अनेकदा फोन केला. त्यावर साराने त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही. तरीही सुभाषने तिचा पिच्छा सोडला नाही. तो सतत तिचा पाठलाग करत असे. एवढेच नव्हे तर साराची बदनामी करण्याची धमकी देखील सुभाष यादवने तिला दिली होती. त्यामुळे यादवला समज देण्यासाठी तिने पुण्यातील चतुःश्रुंगी मंदिर परिसरात त्याला बोलावले होते. पण तिथे देखील त्याने तिला पुन्हा एकदा तिची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे साराच्या ड्रायव्हरने तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी काहीच वेळात तिथे जाऊन त्याला अटक केली. प्रकरण जास्तच वाढत असल्याचे कळल्यानंतर त्या इसमाने पोलीसांसमोर सारा श्रवणची माफी मागितली. सुभाष यादव याने स्वत देखील अनेक चित्रपटांत काम केले आहे.