संवेदनशील लेखिका हरपली…

Update: 2018-09-28 05:25 GMT

ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचे काल गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता निधन झालं आहे. पुण्यातल्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांना न्यूमोनिया झाला होता, ज्यामध्ये त्यांचे निधन झाले. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कथा, कविता आणि कदंबरी अशा तिन्ही प्रकारात त्यांचं प्रभुत्व होतं.

कविता महाजन काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांची सर्वांत पहिली कदंबरी 'ब्र' ही चांगलीच गाजली. महिला सरपंच आणि त्यांच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही कादंबरी होती. तर त्यांची भिन्न ही कादंबरी एचआयव्ही आणि एड्सग्रस्तांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी होती. कुहूच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल विश्वात एक वेगळा प्रयोग सादर केला. इश्मत चुगताई यांच्या लघुकथांचा अनुवाद त्यांनी केला होता, ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला होता. महिलांचे प्रश्न आणि त्याही पलिकडे जाऊन माणसांच्या आयुष्याचे प्रश्न त्यांनी कायम मांडले.

कविता महाजन यांची मुलगी दिशा महाजन यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. दिशा महाजन हिने हे जाहीर निवेदन केले आहे की, परिवारातर्फे हीच अधिकृत प्रतिक्रिया समजावी, तसंच प्रत्यक्ष भेटीऐवजी आपला शोकसंदेश केवळ पत्रात नमूद केलेल्या ईमेलवर व्यक्त करावा, अशी विनंती तिने केली आहे.

Similar News