दिवसेंदिवस किडनीचा (मूत्रपिंड) आजार झपाट्याने वाढत चाललेला आहे. त्यात महिलांचे अधिक प्रमाण आहे. त्यामुळे महिलांची किडनी निकामी झाली तर तिला लवकरात लवकर किडनी दाता मिळत नाही अशावेळी महिलांना आपला जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणाच्या नियमावलीमध्ये एक महत्त्वाचा नियम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मेंदू मृतावस्थेमध्ये असलेल्या (कॅडेव्हेअर) अवस्थेमधील दात्याकडून मिळणारी किडनी प्राधान्याने महिलांना मिळावी यासाठी अग्रक्रम देण्यात येणार आहे. महिलांसाठी जर जिवंत दात्यांकडून (लाइव्ह डोनेशन) किडनी लवकर उपलब्ध होत नसतील तर प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या स्त्रियांना कॅडेव्हअर अवस्थेतील दात्याकडून प्राधान्याने किडनी उपलब्ध होणार आहे.
महिलांमधील स्थिती
किडनी (मूत्रपिंड) शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. एका किडनीत तब्बल 10 लाख नेफ्रॉन्स असतात, जे शरीरातील विषारी घटक मूत्राद्वारे बाहेर टाकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखते, जेणेकरून संपूर्ण शरीराला पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल. परंतु दिवसेंदिवस किडनीचा आजार झपाट्याने वाढत चालला आहे. त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार किडनीचा आजार जडल्यानंतर केवळ 50 टक्के महिलांमध्ये आजाराचे निदान योग्यवेळी होते. किडनी कमजोर होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) ने अधिक ग्रस्त असतात. आजघडीला देशातील तब्बल 27 कोटी महिला ‘सीकेडी’ग्रस्त आहेत. देशातील किडनीच्या रोगाने पीडित 10 टक्के महिलांनाच घरातील सदस्याची किडनी मिळू शकते. किडनी निकामी झाल्यानंतर केवळ 5-8 टक्के रुग्ण डायलिसिसचे उपचार घेऊ शकतात.
विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून प्रतीक्षा यादीमधील किडनीची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी गुणांकन केले जाते. हे गुणांकन करताना किडनीची निकड असलेल्या महिला रुग्णांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी मधील गरजू महिला रुग्णांना दीर्घकाळ तिष्ठत राहावे लागणार नाही. ही नियमावली येत्या काही दिवसांत लागू होईल, असे विभागीय प्रत्यारोपण समितीच्या डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले आहे.