पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत काल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यापुढे कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात भक्तांना भारतीय पद्धतीच्या पोशाखात म्हणजेच संपूर्ण पोशाखात प्रवेश दिला जाईल. तोकड्या कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेश करता येणार नाही. तसेच चित्र विचित्र पद्धतीने मोबाईलमध्ये फोटो घेतल्यास त्यांना मंदिरातून बाहेर काढले जाणार आहे.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उत्सव नीट पार पडण्यासाठी हि बैठक झाली. तसेच पत्रकार परिषदेत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधवांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदिरात देश-विदेशातून भाविक येत असतात. मात्र त्यातील काहीजण आधुनिक वेशात येतात. त्यांचा वेश आक्षेपार्ह्य असल्याची पत्रे देवस्थान समितीकडे आली आहेत. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य राहत नाही, असाही तक्रार करणाऱ्या भाविकांचा सूर आहे.
ही बाब लक्षात घेऊन यापुढे मंदिर प्रवेश करताना भारतीय पद्धतीच्या पूर्ण पोशाख असावा याची दक्षता घ्यावी. शॉर्ट, थ्री फोर्थ सारखे तोकडे कपडे परिधान केल्यास मंदिरातून बाहेर काढले जाणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीने स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे, तसेच मंदिरात आल्यानंतर भाविकांना छायाचित्रे काढण्याची हौस असते. पण, अनेकजण अशिष्ट स्थितीमध्ये उभे राहून मोबाईलवरून छायाचित्रे काढतात. सभ्येतेच्या मर्यादा ओलांडली जाणारी ही पद्धत बंद केली जाणार असून अशाप्रकारे छायाचित्रे काढण्यासही मज्जाव केला आहे