प्रेमसंबंधतात अडथळा ठरत असणाऱ्या पतीचा नववविवाहीतेने प्रियकराच्या मदतीने अन्नात विष घालून काटा काढला आहे, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. तसेच नवविवाहीता माधवी आनंदा आसबे हिच्या विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथील या घटनेनंतर नातलगांसह १०० गावकर्यांनी याबाबत मुरगूड पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सावर्डे बुद्रुक येथील महादेव शिवाजी घराळ यांचा हमिदवाडा येथील माधवी आनंदा आसबे हिच्याशी १८ जुलै २०१८ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर माधवीचे पूनम महादेव घराळ असे नामकरण झाले. घरात दोघे पती-पत्नीच राहत होते. महादेव गोकुळ शिरगाव एमआयडीसीत नोकरी करत होता. महादेव कामाला गेल्यानंतर पूनम ही प्रियकराला भेटत असे. याबद्दल महादेवला संशय आल्याने दोघांमध्ये वादावादीचे प्रकार घडत होते. अशातच प्रेमसंबंधातील अडसर कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने पूनमने प्रियकराच्या मदतीने महादेवचा कायमचा काटा काढायचा डाव आखला. त्यानुसार महादेवला चहा आणि जेवणातून विष दिले, असा आरोप महादेवच्या नातेवाईकांनी केला आहे. महादेवचा खूनच झाला असून तो अनैतिक संबंधातून झाला आहे. पूनम आणि तिच्या प्रियकराची या प्रकरणी चौकशी करून तिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत महादेव घराळच्या बहिणी अनिता जयसिंग पाटील (वाळवे खुर्द), उषाताई बाळू ढोले (अर्जुनवाडा), सुनिता विश्वनाथ पसारे (सावर्डे खुर्द) यांच्यासह १०० ग्रामस्थांनी सह्यांच्या निवेदनाद्वारे मुरगूड पोलिसांकडे केली आहे.