उत्तर बंगालमधील जलपाईगुडी शहरात बुधवारी आनंदाची लाट आली, जेव्हा एका रिक्षा चालकाच्या मुलीने एशियाडमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. भारताच्या स्वप्ना बर्मनने हेप्टॅथ्लॉन प्रकारात भारताला एशियाडचं सुवर्णपदक मिळवून दिलं. एशियाडच्या इतिहासात हेप्टॅथ्लॉनचं सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
स्वप्नाने ६०२६ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हेप्टॅथ्लॉनमध्ये अॅथलेटिक्सच्या सात खेळांचा समावेश होतो. त्यात १०० मीटर्स, २०० मीटर्स, ८०० मीटर्स धावण्याची शर्यत खेळवली जाते. याशिवाय उंच उडी, लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेकीचाही हेप्टॅथ्लॉनमध्ये समावेश असतो. स्वप्नाने या सातही खेळांत सर्वाधिक गुणांची कमाई करत अकरावं सुवर्ण भारताच्या झोळीत टाकलं.
स्वप्नाचे वडील पंचन बर्मन रिक्षा चालवतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून आजारामुळे ते अंथरुणावर आहेत. हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही तिच्या गरजा पूर्ण करु शकत नाहीत, पण तिने कधीही तक्रार केली नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया स्वप्नाची आई बशोना यांनी दिली.
बूट घालण्यासाठी संघर्ष
एक वेळ अशी होती, जेव्हा स्वप्नाला योग्य बूट निवडण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता, कारण तिच्या दोन्ही पायाला सहा-सहा बोटं आहेत. पायाच्या अतिरिक्त रुंदीमुळे तिला खेळात अडचण येत होती, त्याचमुळे तिचे बूट लवकर खराब व्हायचे.