दहीहंडीने आला दहीहंडीने घालवा...

Update: 2018-09-05 12:59 GMT

राज्यभरात स्वाइन फ्लूचं थैमान सुरू होतं. संपूर्ण राज्यात अलर्ट देण्यात आला होता. प्रशासनाने समूहाने एकत्र यायला बंदी घातली होती. त्यामुळे मुंबईतील दहीहंडी मंडळांनी समंजसपणा दाखवत सर्व गोविंदा पथकाच्या सहमतीने दहीहंडी न खेळण्याचा निर्णय घेतला. हीच संधी ओळखून असंवेदनशीलतेचा कळस गाठत राम कदम यांनी १ कोटीची दहीहंडी लावली. त्यांनी १ कोटी दिले का, त्यामागचं नेमकं गणित काय हे सर्वांनाच माहित आहे. त्यावेळी ते मनसे मध्ये होते आणि इतकी असंवेदनशीता दाखवल्यानंतरही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राम कदम यांचं तिकीट पक्कं करून टाकलं.

आज राम कदम यांच्या विरोधात राज्यभर काहूर माजलंय. राम कदम यांनी दहीहंडीच्या स्टेजवरून जे असंवेदनशील वक्तव्य केलं त्यामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यातल्या सर्वच पक्षांनी आणि महिला नेत्यांनी राम कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. उद्या राम कदम यांच्यावर कारवाई होईलही. त्यानंतर पुढच्या निवडणूकीत पैशाच्या बळावर ते पुन्हा तिकीट विकत घेऊन आमदारच काय मंत्री ही बनतील. जे राजकीय पक्ष आज आंदोलन करतायत तेच उद्या राम कदम यांच्यासाठी पायघड्या घालतील. ज्या महिला नेत्या आज आंदोलन करतायत, त्याच राखी बांधून साड्यांची भेट घ्यायला रांगा लावतील. विषय विरून जाईल आणि सगळं नव्याने सुरू होईल. आणि हाच खरा चिंतेचा विषय आहे.

अशा पद्धतीचं वक्तव्य करणारे राम कदम हे काही पहिलेच नेते नाहीत. या आधी सर्वपक्षीय नेत्यांनी मुक्ताफळे उधळलीयत. मात्र त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक स्थानात-मानात कसलीच कमतरता आलेली नाही. उलट आज पैशाच्या जोरावर हे नेते विविध पक्षांमध्ये मानाचं स्थान मिरवतायत. काही गरज वाटलीच तर सोशल मिडीया कँपेन, ओआरएम म्हणजे ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंट करून, माध्यमं विकत घेऊन ब्रँडींग करतील.

हे सर्व होत राहील. आपण बघत बसू. पण या बघत बसण्याच्या पुढे जाऊन आपण आता आवाज उठवला पाहिजे. देशातल्या कुठल्याही सेलिब्रीटी, नेता, अधिकारी किंवा पॉवरफुल माणसाला महिलांबाबत अशा पद्धतीचे हीन बोलण्याचा अधिकार नाही. महिलांचा सन्मान न ठेवणाऱ्या अशा लोकांना धडा शिकवायची वेळ आलीय. राम कदम दहिहंडीच्या खेळातून आमदार झाले, याच खेळात त्यांची आमदारकी घालवली पाहिजे. सर्व महिला एकत्र आल्या तर हे अशक्य नाही. हीच वेळ आहे या बोलघेवड्यांना धडा शिकवायची.

Similar News