त्यावेळी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष सिनिअर बुश यांची दुसरी इनिंग सुरू होती. अमेरिकन सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधीशनिवडीची प्रक्रिया सुरू होती. Clarence Thomas यांच्या नावाचं नॉमिनेशन झालं होतं. आणि अचानक, नागरी हक्क चळवळीतली कायदेतज्ञ Anita Hill यांनी थॉमस यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी, मी एका फेलोशिपसाठी वॉशिंग्टन डीसीमध्येच होते. मला मिडिया कम्युनिकेशन कन्सोर्शियम या संस्थेत काम दिलं होतं. उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मिडियाचा उपयोग कसा करायचा, याचं प्रात्यक्षिक करणारी, कार्यकर्त्यांना तसं प्रशिक्षण देणारी ही संस्था. लेअल स्टिगल तिथली प्रमुख. ही बाई माध्यमं आणि चळवळ दोहोंतली जाणकार. अमेरिकेतले काळे, रेड इंडियन्स, हिस्पॅनिक्स अशा वंचित समाजघटकांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण तिथे चालायचं. अमेरिकेत काय, परदेशातच पहिल्यांदाच गेलेली मी. पोचून, इन्स्टिट्यूटमध्ये फेलोशिपचं काम सुरू होऊ अवघे तीनचार दिवस झालेले. इंटरनेट सुरू व्हायचं होतं, सोशल मिडियातला ‘स’सुद्धा माहीत नव्हता, असा तो काळ. कन्सोर्शियममधला माझा पहिलाच दिवस. स्टाफची ओळखपाळख झाली. ताजी वृत्तपत्रं वाचून सध्या अमेरिकेत काय चाललंय, ते समजून घे, असं सांगितलं गेलं. वॉशिंग्टन पोस्ट वाचायला सुरूवात केली. आणि Anita Hill ने आदल्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या बातम्या नजरेत भरल्या. माझी तेव्हाची समज यथातथाच. तरी, जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रकरणाला बरेच कंगोरे होते, इतकंच लक्षात आलं. लंचब्रेकच्या आधी कन्सोर्शियममध्ये लगबग सुरू झाली. तातडीची स्टाफ मिटिंग घेतली. तेव्हा कळलं की, त्याच दिवशी संध्याकाळी कॅपिटॉल हिल इथे स्त्रीसंघटनांची निदर्शनं आयोजित करायचं ठरतंय. माझ्यासाठी प्रत्येक क्षण चित्तथरारक होता. मलाही एक बारिकसं काम दिलं होतं. डीसीमधल्या विविध एनजीओंचे फोन नंबर्स दिले होते. तिथे फोन करून फॅक्स नंबर विचारून घ्यायचे आणि कन्सोर्शियमच्या फॅक्सवरून निरदर्शनाचं पत्रक सगळीकडे फॅक्स करायचं. जास्तीत जास्त स्त्रिया निदर्शनासाठी जमतील, हे बघायचं. अमेरिकन इंग्लीश उच्चारांशी झगडून मी माझ्या परीने ते काम चांगलं करण्याचा प्रयत्न केला. कन्सोर्शियममधल्या एका विभागाने पटापट आकर्षक पोस्टर्स, बॅजेस, सिनेटर्सना गाठून त्यांच्या हातात देण्यासाठी आकर्षक निवेदनं बनवली. संध्याकाळी ६ च्या सुमारास आम्ही कॅपिटॉल हिलमध्ये दाखल झालो. बायका घोषणा देत होत्या. मिडियाशी बोलत होत्या. सिनेटर्सना गाठून थॉमस नेमणुकीला विरोध करण्याची विनंती करत होत्या. दुसर्या दिवशी आमच्या निदर्शनाच्या बातम्याही पेपरात छापून आल्या. प्रकरण तापत गेलं. पुढे, अनिता हिलची सिनेट कमिटीपुढे साक्ष झाली, ती लाइव्ह दाखवली गेली. ती पाहाताना मलाही खजिल व्हायला झालं होतं. अखेरीस थॉमसच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. पण सुमारे आठपंधरा दिवस अमेरिकेतल्या स्त्रियांचे प्रश्न, लिंगभेद, स्त्रियांना करावा लागणारा छुपा संघर्ष, थॉमस आणि हिल हे दोघंही काळे, त्यामुळे काळ्या लोकांच्या संघटनांना भूमिका घेण्यात येणार्या अडचणी, प्रेसिडेंट बुश यांचा उतरणीच्या काळाचा, पहिल्या इराक युद्धामुळे त्यांच्या विरोधात गेलेल्या जनमताचा फायदा घेण्यासाठी अनिता हिल प्रकरण वापरलं जाणं, सत्ताधारी रिपब्लिक आणि विरोधक डेमोक्रॅट्स यांनी केलेलं राजकारण, असे अनेक मुद्दे माझ्यापुढे उलगडत गेले. या प्रकरणावर पुढे अनेक पुस्तकं आली. अनिता हिल नावाचा सिनेमाही आला.
आज, साल २०१८. पुन्हा ऑक्टोबर. प्रेसिंडेंट ट्रंप. Brett Kavanaugh याचं नाव नॉमिनेट झालेलं. Christine Blasey Ford हिने त्याच्यावर केलेले आरोप. तिची साक्ष. आणि अखेरीस सुप्रिम कोर्टासाठी ब्रेटच्या नावावर शिक्कामोर्तब. १९९१ मध्ये घडलेल्या, इतिहासाची पुनरावृत्तीच. आज, सीएनएन पाहताना १९९१ ची आठवण आली. काळ बदललाय का खरंच?