बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांची भ्रष्टाचार प्रकरणीची शिक्षा न्यायालयाने वाढवली आहे. याआधी त्यांना ट्रायल कोर्टाने झिया ऑर्फनेज ट्रस्टच्या भ्रष्टाचार प्रकरणात पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती.
त्यानंतर सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी आयोगाने ही शिक्षा वाढवून द्यावी अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली होती. ती याचिका हायकोर्टाने आता मान्य केली आहे. बेगम खलिदा झिया यांची शिक्षा दुपटीने वाढवत दहा वर्षे इतकी केली आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात झिया ऑर्फनेज ट्रस्टच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा निकाल देऊन झिया यांना पाच वर्षाची शिक्षा देण्यात आली होती. परंतू आता हि शिक्षा दुपटीने वाढवल्याने त्यांना आता दहा वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. यामुळे झिया यांना संसदेची डिसेंबर महिन्यातील निवडणूक लढवता येणार नाही.