सतराव्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातील मतदानाची सोमवारी सांगता होते आहे. निवडणूका म्हटल्या की सत्ताधारी आणि विरोधक आलेच. तसंच मतदारांपर्यंत आपले म्हणणे पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रचार आणि प्रचाराचे नवनवीन तंत्र शोधण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळीही सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापल्या परीने प्रचार केला असला तरी यावेळी चर्चा झाली ती निवडणूक न लढताही तगडा प्रचार करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे यांची.
निवडणूकीपुर्वी राज्यातील वातावरण हे भाजपा शिवसेनेला पोषक असल्याचे चित्र होते. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून लोकसभेवर ४५ जागा निवडून आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. काही राज्यात भाजपाला फटका बसणार हे गृहित धरून जिथे पीक चांगले वाटते आहे त्या महाराष्ट्रातून अधिक माप पदरात पाडण्याचा त्यांचा विचार होता. त्यातच राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मतदारसंघांवरून शेवटच्या क्षणी जुंपली होती. विखे पाटील, मोहिते पाटील या दिग्गज घराण्यांनी कमळ हातात घेतले होते. अशोक चव्हाणांना जबरदस्तीने निवडणूकीत उतरावे लागले होते. त्यांचे कॉंग्रेस अंतर्गत पटत नव्हते.
त्यातच साडेचार वर्षे उपसलेली विरोधाची तलवार शिवसेनेने गुपचूप म्यान करीत पुन्हा मोदी शहा की जय म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाही जागांचे पीक चांगले चांगले येणार या आनंदात भाजपाने राज्यभरात प्रचाराची आणि बेफिकीरीची भाषा अतिशय जोरदारपणे चालवली होती. मात्र, पाडव्याला राज ठाकरे यांनी मोदी शहा यांच्या विरोधाची गुढी उभारून भाजपाला पहिला धक्का दिला.
ही केवळ पाडव्याची मनसेची पारंपरिक सभा असेल असा समज भाजपाचा झाला होता. पण ही विरोधाची धार अधिक तीव्र करीत राज्यभरात सभा घेण्याचा आणि मोदी शहा यांचा कारभार पुराव्यानिशी उघडा पाडण्य़ाचा राज यांनी सपाटाच लावला. एखाद्या कुस्तीच्या लढतीत दोन मल्ल लढत असताना आखाड्याच्या बाहेर बसलेल्या मल्लाने काही डाव सांगत राहणे आणि त्यामुळे जिंकणारा मल्ल अस्वस्थ होणे अशीच परिस्थीती भाजपाची झाली आहे. बरं राज यांना अंगावर घ्यावे की क़ॉंग्रेस राष्ट्रवादीशी दोन हात करावेत अशी द्विधा मनस्थिती भाजपा नेत्यांची झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे त्यांना धड विरोधकांशी लढता येईना धड राज यांच्या प्रश्नांना उत्तर देता येईना. बरे राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नसल्याने त्यांच्याशी लढून वेळ घालवण्यात काय अर्थ आहे, असा विचार भाजपा नेत्यांनी एकीकडे केला असताना राज मात्र त्यांच्याविरोधात रान पेटवत सुटले होते. मारूतीच्या शेपटीला आग लागल्यानंतर त्याने ज्याप्रकारे लंकेला आग लावली होती तसा प्रकार राज यांनी राज्यात सभा घेऊन केला. त्यामुळे जनमतावर परिणाम होऊन भाजपाच्या बाजूची असलेली हवा कधी फिरू लागली हेच न कळाल्याने भाजपाने राज यांचा
धसका घेतला. त्याला उत्तर म्हणून त्यांनी “आता हा व्हिडीओ बघाच” ही सभा घेऊन राज यांच्या व्हिडिओ तंत्रानूसार त्यांचे जूने व्हिडिओ दाखण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबतही राज यांनी आधीच स्पष्टता केल्याने फाटलेल्या मतांच्या चादरीला ठिगळ लावण्याचा हा केविलवाणा प्रकार भाजपाला करावा लागल्याचे दिसते.