पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी आलेल्या पुराने सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आत्तापर्यंत हा नदीला आलेला सर्वात मोठा पूर होता. असं गावातील लोक सांगतात. कोल्हापूर जिल्ह्यात या पुरानं अक्षरश: थैमान घातलं होतं. १०७ वर्षानंतर सगळ्यात भयंकर असा महापूर म्हणून २०१९ च्या महापुराची नोंद केली गेली आहे. पंचगंगा नदीने ५५ फुटाच्या पाण्याची पातळी गाठली होती. या महापुरामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांना सुमारे १२ हजार पेक्षा अधिक कोटींचा फटका बसला होता.
३० जुलै ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीमध्ये तब्बल १०८६ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली. या पुराचा फटका २४० गावांना बसला होता. ८९ प्रमुख रस्ते आणि १०४ बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. यामध्ये सर्वात जास्त फटका आंबेवाडी, चिखली, प्रयाग, वडणगे, शिरोली, शिये, आणि शहरातील अनेक भागांना बसला होता.
या महापुरामुळे वित्तीय आणि शेतीची प्रचंड प्रमाणात हानी झाली होती. उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे ११०० कोटीचा फटका उद्योग क्षेत्राला बसला तर लाखो हेक्टर जमिनीतील पिके या महापुराच्या पाण्यात कुजली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास ४ लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आले, तर ४० हजारपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. हजारो जनावरे यामध्ये दगावली. या महापुराचा मुकाबला करण्यासाठी ५४ बोटी, १७२ जवान, नौदलाची ३ विमान, २ हेलीकॉप्टर सह प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था आणि अनेक तरुण मंडळे युद्धपातळीवर झटत होते.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्यात १५३ कोटींची मदतची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली होती.या मदतीमध्ये शहरी भागासाठी १५ हजार तर ग्रामीण भागासाठी १० हजार अशी तरतूद केली होती. गावामध्ये माहिती संकलित करीत असता, लोकांशी बोलत असता अनेक जणांनी मदत मिळाल्याचे कबुल केले.
गावपातळीवरील तलाठी त्यांच्याशी संपर्क साधून विचारले असता जवळपास ८० ते ८५ टक्के पंचनामे आत्तापर्यंत पूर्ण झाले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे इतर पंचनाम्यांना विलंब होत असल्याचे तलाठ्याने सांगितले. म्हणजे गेल्या वर्षभरात रोख स्वरुपात मिळालेल्या मदती व्यतिरिक्त अद्यापर्यंत कोणतही मदत या लोकांना मिळालेली नाही. विशेष म्हणजे ज्यांची घर पडली. त्यांना घरं बांधून दिली जातील. असं बोललं जात होतं. मात्र, गेल्या वर्षभरात फक्त पंचनामे झाले आहेत. त्यातच कोरोना मुळं त्यांच्या घराचं काम रखडल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.
या संदर्भात सविता कांबळे मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगतात...
गेल्या वर्षीच्या पुराची अजुनही आठवण येते. आजही आम्हाला पुराची भीती वाटते. पडझडीचे पैसे मिळाले. त्याच्याबद्दल मला मदत तरी व्यवस्थित मिळाली. पंचनामा झाले. अर्ज देखील भरले आहेत. फक्त कोरोनामुळं पुढं काम होत नसल्याचं सविता कांबळे यांनी सांगितलं. लॉकडाऊन उघडल्यावर काय होतंय पाहू असं त्यांनी सांगितलं.
हौसाबाई सांगतात... सध्या कोरोनाचीच भीती जास्त आहे. सध्या इथं राहतो. मात्र, महापूर आला की सोडून जावं लागणार. यंदा कोरोना असल्यामुळं पाहुण्याकडं जाऊ शकणार नाही. ग्रामपंचायतीने सांगितलं आहे. सोडा आम्ही सहकार्य करतो. आता ग्रामपंचायत सांगेल, जिथं सोय करेल तिथं जावं लागणार. यंदा हाताला काम नाही. घराचं भाडं कुठून देणार? असा सवाल हौसाबाई यांनी केला आहे.
कोल्हापूर चे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी यंदा जर पूर आला तर त्यासाठी प्रशासनानं बोटी खरेदी केल्या असल्याचं सांगत आहेत. प्रशासन पुर्णपणे सज्ज असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, लोकांचं जे नुकसान झालं आहे. ज्यांना घरांची गरज आहे. अशा लोकांना घरं कधी मिळणार? या प्रश्न अनुत्तरीतच आहे.