राज्यातील मंदिरं खुली करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन : प्रकाश आंबेडकर
लॉकडाऊनमुळे बंद कऱण्यात आलेली मंदिरं येत्या ८ ते १० दिवसात खुली केली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाच महिन्यांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुकाने, मॉल खुली होत असताना राज्यातील मंदिरंही सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेमार्फत पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं लवकरच खुली करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने मंदिरं खुली करण्याची मागणीसाठी राज्यभरात आंदोलन केले होते.