राज्यातील धनगर बांधवांबाबत केंद्र दुजाभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेनं काल लोकसभेत केला. अनुसुचित जमातीसंदर्भातील दुरूस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. केवळ कर्नाटकातील आदिवासी जातींसाठी हे विधेयक मांडण्यात आले होते. यावर बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सरकारच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला.
महाराष्ट्रातील धनगर बांधव हे ही आदिवासींमध्येच मोडत असून धनगर आणि धनगड अशा शब्दभ्रंशापोटी ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. कर्नाटकातील आदिवासी जमातीबाबत केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घेतली. मात्र, राज्यातील धनगर बांधवांबाबत दुजाभाव का असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला.
एका राज्यासाठी विधेयक आणण्याची मेहेरनजर केवळ कर्नाटकवरच का? महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी काय घोडे मारले असा सवालही खासदार सावंत यांनी यावेळी केला.