अकोल्याची विद्यमान खासदार आणि भाजपचे लोकसभेतील उमेदवार संजय धोत्रे विजयाचा चौकार लगावणार का, याची उत्सुकता निर्माण झालीय. कारण धोत्रे यांना वंचित बहुजन आघाडीच्या अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या हिदायत पटेल यांनी तगडं आव्हान दिलेलं आहे. यापार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं सामान्य नागरिकांशी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी ‘चाय पे चर्चा’ करत त्यांचा जाहीरनामा जाणून घेतलाय.
नोटबंदीचा सामान्यांच्या आयुष्यावर काय फरक पडला याविषयी जाणून घेतल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. नोटबंदीचा फटका हा हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर अधिक झाल्याचं समोर आलंय. नोटबंदीनंतर हाताला कामं मिळण्याचं प्रमाण कमी झाल्याचं मजूरांनी सांगितलं. लोकं आता रोखीनं व्यवहार करण्यापेक्षा कॅशलेस व्यवहाराकडे वळतं असल्याचं काहींनी सांगितलं. नोटबंदी आधी रोजगारातून चांगला मोबदला मिळायचा तो आता कमी झाल्याचं मजूरांनी सांगितलं. नोटबंदीनंतर अनेकांना नोकरी गमवावी लागलीय. छोट्या व्यावसायिकांनाही नोटबंदीचा फटका बसलाय.
सध्या लोकसभा निवडणूकांचं वातावरण आहे. मात्र, नेत्यांच्या प्रचारात शेतकऱ्यांचे मुद्दे फारसे चर्चिले जात नाहीत. त्यामुळं सरकारकडून फारशा अपेक्षा नसल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. तर शहरी भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात विकास झाला असून ग्रामीण भागात मात्र विकास फारसा झाला नसल्याचंही अनेकांनी सांगितलं. केंद्र सरकारनं दहशतवादाविरोधात चांगल काम केल्याचं काहींनी सांगितलं. हे सगळं खरं असलं तरी चाय पे चर्चा करतांना अनेकांनी मोदीजी, हातांना कामं द्या हो, अशी एकमुखी मागणी केलीय.