पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराला आज वर्धा या ठिकाणाहून सुरुवात केली. आज सकाळीच मोदींनी मराठी भाषेत ट्विट करत ही माहिती दिली होती. मात्र, मोदींच्या या ट्विटला महाराष्ट्रातील वर्धा वासियांना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. सभेतील बराचश्या खुर्च्या रिकाम्या असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपने 2014 च्या निवडणुकींच्या प्रचाराची सुरुवात वर्धा येथे सभा घेऊन केली होती. 2014 च्या निवडणूकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे भाजपला वर्धा लकी असल्यामुळे भाजपने महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवात वर्धा येथून केली. मात्र, जवळ जवळ 18 एकरच्या मैदानावरील अर्ध्याहून अधिक भाग रिकामा होता. तसंच मोदींचे भाषण सुरु असतानाही या ठिकाणी लोक उठून जात होते. या सभेच्या मागील खुर्च्या रिकाम्या असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.
मोदींचा पवारांवर निशाणा...
मोदींनी या सभेत शरद पवारांवर हल्ला चढवताना, अजित पवार आणि शरद पवारांमध्ये आलबेल नसल्याबाबत सुचक इशारा दिला. 'शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली' असं मोदींनी म्हटलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू असल्याचा दावा मोदींनी केला आहे. शरद पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहात आहे. असं म्हणत मोदींनी अजित पवार यांचे नाव न घेता. कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारांना तिकिटे देण्यात अडथळे येत असल्याचंही यावेळी मोदींनी सांगितलं.