ओमी कालानी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी भाजपासोबत राजकीय जवळीक केली, तेव्हा त्यांना आमदारकीचं आश्वासन दिलं गेलं होतं. पण तिकीटासाठी शेवटपर्यंत झुंजवत ठेवून भाजपने धोका दिला. आता आम्हाला उल्हासनगरवासियांनीच सांगावं की, आम्ही काय करावं? आम्ही राजकारण सोडावं की कालानी परिवाराची सेवा आपणास हवी आहे? असं भावनिक आवाहन आमदार ज्योती कालानी यांनी शहरवासीयांना केलं आहे. ज्योती कालानी भाजपा विरोधात निवडणूक लढवतील, अशी चिन्हं असून, तसं झाल्यास त्या अपक्ष लढतात, वंचितची उमेदवारी मागतात की पुन्हा राष्ट्रवादीकडे पदर पसरतात, हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कालानी परिवाराचं राजकारण म्हणजे राजकीय पक्षांसाठी धरलं तर चालतं आणि सोडलं तर पळतं, असं झालं होतं. भाजपाला उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ सुरक्षित असण्यासाठी कालानीशी तडजोड हवी होती, पण सोबत चालत येणारी बदनामी नको होती. हे कारण सांगून भाजपाने ज्योती कालानींच्या उमेदवारीला नकार देऊन, महापौर पंचम कालानींच्या उमेदवारीची शक्यता दर्शवली. दरम्यानच्या काळात, सुनेची अडचण नको, म्हणून ज्योती कालानींनी राष्ट्रवादीचा राजीनामा पण दिला.
पण कालानी परिवारात भाजपाची उमेदवारी गेली तर भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि रिपाईला त्यांच्यामागे फरफटावं लागणार होतं. दोन्ही पक्षांचा कालानी परिवारात तिकीट द्यायला विरोध होता. शिवाय कुमार आयलानी यांनी कालानीच्या उमेदवारीविरोधात सरळ दिल्लीत फिल्डिंग लावली होती. ती सफल झाली आणि उमेदवारी कुमार आयलानी यांना मिळाली.
कालानीच्या राजकारणाला आमचा विरोध आहे, पण युतीधर्म निभावू, असा पवित्रा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घेतला होता खरा, पण ते स्वत:ही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून इच्छुक होते. दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव ताठर भूमिकेत होते. तेही निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. भाजपाने कालानी कुटुंबात कोणालाही उमेदवारी दिली तर युती असली तरीही त्यांच्यासाठी काम करणार नाही, उलट स्वत: निवडणूक लढवणार, असं रोखठोक प्रतिपादन भालेराव यांनी केलं होतं.
भाजपाचं प्रदेश नेतृत्व कालानीच्या बाजूने होतं. पण शिवसेना आणि रिपाइं या दोन्ही मित्रपक्षांचा व स्वपक्षातीलही पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि दिल्लीतून आलेला दबाव यामुळे प्रदेश भाजपाला कालानींची उमेदवारी लादणं शक्य झालं नाही.
निवडणूक लढवायचीच, असा कालानी परिवाराचा निर्धार आहे. अपक्ष लढवली तर भाजपाला तोंड देणं मुश्कील होईल, म्हणून ज्योती कालानी वंचित किंवा पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे साकडं घालायचीही शक्यता आहे. परंतु, राष्ट्रवादीने भारत राजवानी यांना उमेदवारी घोषित केली असून, त्यांना एबी फाॅर्मही दिला आहे. अशा परिस्थितीत निवडून येण्याच्या शक्यतेच्या लालसेने पक्षाला लाथाडलेल्या ज्योती कालानींना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देईल का, हा प्रश्न आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या तक्रारीवरून ओमी कालानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तडीपारीची कारवाई पोलिस विभागात प्रलंबित आहेत. भाजपा विरोधात गेल्यास ओमी कालानी व त्याच्या सहकाऱ्यांवर तडपारीच्या कारवाईची व समर्थक नगरसेवकांच्या अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवाय, ज्योती कालानी यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्यावरही अपात्रतेच्या कारवाईची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कालानी गट आता काय भूमिका घेतो, याकडे शहराचं लक्ष आहे. एकंदरीत, अनेक दगडांवर पाय ठेवून राजकारण करणं कालानी परिवाराच्या अंगलट आलं असून शरद पवारांना ऐनवेळी कालानीप्रेम दाटून न आल्यास उल्हासनगरातून कालानीपर्व संपल्यात जमा आहे.