१ मे रोजी गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. यातील दोन जवान हे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. या दोन्ही शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्री मदन येरावार हे अनुपस्थित राहिल्यानं शहीदांच्या कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीय.
गडचिरोलीतल्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीला जातात. तर पालकमंत्री हे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर आणि आळंद इथल्या शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला का उपस्थित राहू शकत नाहीत, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. शहीदांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी आणि अंत्यसंस्कारानंतर शहीदांच्या कुटुंबियांच्या विचारपूस किंवा सांत्वनपर भेट घ्यायला पालकमंत्री का आले नाहीत, अशी विचारणा शहीद पोलीस जवान सर्जेराव खर्डे यांच्या पत्नीनं स्वाती यांनी केलीय. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. त्यावेळीही पालकमंत्री येरावार हे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनुपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात १ मे रोजी सी-६० शीघ्र कृती दलाच्या १५ जवानांना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाला माओवाद्यांनी भूसुरुंगानं उडवून दिलं होतं. या स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस जवान सर्जेराव खर्डे आणि राजू गायकवाड यांचा समावेश होता. या दोघांच्याही पार्थिवावर ४८ तासांनी त्यांच्या मूळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पुलवामा हल्ल्यातीमधील दोन्ही जवानांवर ४८ तासांनी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही घटनेतील शहीद जवानांचे पार्थिव पोहचण्याचा कालावधी बघितला तर पुलवामा कोसोदूर असताना पार्थिव त्या तुलनेत लवकर जिल्ह्यात पोहचले. मात्र गडचिरोली हल्ल्यातील जवानांचे पार्थिव हे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून थांबवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते पार्थिव नातेवाईकांकडे देण्यात आले. शिवाय तेथील पोलीस प्रशासनानेही पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केले नसल्याचा आरोप शहीद पत्नी स्वाती खर्डे आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. ग्रामस्थांनी सुद्धा प्रशासनाच्या या वागणुकीचा आणि सरकारचा जाहीर निषेध केलाय.
सरकारकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आलीय. मात्र, त्याची अद्यापही कल्पना त्यांच्या पत्नीला नसून कोणतीच मदत पोहचली नसल्याचा आरोप वीरपत्नी स्वाती खर्डे यांनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासन दिले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं म्हटलंय. सरकारने त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी, घर चालवण्यासाठी आणि त्यांच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केलीय. मदत तर लांबच मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार हे अंत्यसंस्काराच्या चार दिवसानंतरही शहीदांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीला आले नाहीत, याविषयी खंत व्यक्त केली जातेय.
शहीदांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू न शकणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. राज्याचे ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध राज्यमंत्री मदन येरावार यांची बुलडाणा जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केली. तेव्हापासून ते पालकमंत्रीपदाची जबाबदारी विसरलेत, असा आरोप काँग्रेसनं केलाय.
शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेणार – पालकमंत्री मदन येरावार
गडचिरोलीमधील माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. आचारसंहितेमुळं मदतीची घोषणा करता येत नाही. मात्र, याच हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा इथलाही जवान शहीद झाला होता, त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलो होतो, असं पालकमंत्री येरावार यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.