पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात तब्बल ५८ मंत्र्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला तशी चार कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदं मिळालेली आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्राला आठ मंत्रिपदं मिळालेली आहेत. चार कॅबिनेट मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा समावेश आहे. तर राज्यमंत्र्यांमध्ये रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोतरे यांचा समावेश आहे. मग तांत्रिकदृष्ट्या तो आठवा मंत्री कोण असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे. व्ही. मुरलीधरन. होय, केरळमधील कोझीकोड जिल्ह्यातील करपारंबा इथल्या व्ही. मुरलीधरन यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. मुरलीधरन हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. एप्रिल २०१८ मध्ये त्यांना भाजपनं महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून दिलं होतं. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्राला ८ मंत्रिपदं मिळालेली आहेत.