सध्या कोणकोणत्या पक्षात प्रवेश करेल सांगता येत नाही. रात्री एका पक्षात असलेले नेते सकाळी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेत आहेत. तर दुसरीकडे अनेक खोट्या बातम्य़ा देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याचं एक पोस्टर व्हायरल झालं होतं. त्यानंतर निखिल वागळे यांनी मॅक्समहाराष्ट्रवर बोलताना आपण कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केला नसल्याचं सांगितलं होतं. आता, आणखी एक पोस्टर व्हायरल झालं असून यामध्ये चक्क सैराटकार नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचा आशय मांडण्यात आला आहे.
अगोदरच, ५ वर्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करत भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि ५ वर्ष सत्तेची गोडी चाखत विरोधी पक्षात प्रवेश केलेले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांचे कन्फ्युजन झालेले असताना सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचे मेसेज व्हायरल होत असल्यानं सजग नागरिकांच्या मनात देखील देशात नक्की काय सुरु आहे. असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
काय आहे मेसेज?
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
सोशल मीडिया आणि प्रचार...
सध्या मुख्य माध्यमांपेक्षा सोशल मीडियावरुन उमेदवारांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं सध्या तरी दिसून येते आहे. सोशल मीडियावर मतदार उमेदवारांच्या बॅनर खाली आपलं मत व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर मतदारांना व्यक्त होत असल्यानं मतदार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. त्याचमुळे उमेदवार देखील सोशल मीडियावरील प्रचारावर चांगलंच लक्ष देत आहेत.
दरम्यान या संदर्भात आम्ही नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. मात्र, त्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्यापपर्यंत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं सांगितलं आहे.