आदिवासी आश्रमशाळेत मिळायचं निकृष्ट जेवण; संतप्त विद्यार्थ्यांनी फोडले संगणक
आदिवासी आश्रमशाळेत सुविधा नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतल्या मालमत्तेची तोडफोड केल्याची घटना मेहकर तालुक्यात घडली आहे. मागच्या काही दिवसांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातंय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. विद्यार्थ्यांनी आपला राग शाळेच्या मालमत्तेवर काढल्यानंतर आश्रमशाळेच्या प्रशासनानं विद्याद्यार्थ्यांसाठी चांगलं जेवण उपलब्ध करुन दिलं.
मेहकर तालुक्यातील चिंचाळा जिजामाता आदिवासी निवासी आश्रम शाळेत १ ली ते १२ वी पर्यंतचे ३८३ आदिवासी मुले-मुली निवासी राहून शिक्षण घेत असल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात पटावर थोडेच विद्यार्थी हजर असतात. अशा या शाळेत समस्यांचा पाढा खूप मोठा आहे. शाळेतील विध्यार्थ्यांना जेवण बरोबर दिलं जात नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत असते. आश्रमशाळेत निवासी शिक्षण घेणाऱ्या मुलींचीही संख्या मोठी आहे. पण असं असलं तरी शाळेच्या परिसराला साधं भिंतीचं कुंपणही नाही. त्यामुळं या मुलींची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचडेस्क नसल्याने लहानांसोबत मोठ्या मुलींनासुद्धा खाली बसून शिक्षण घ्यावे लागतं.
शनिवार २८ सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी होती. यादिवशी शाळेत शिक्षक आणि अधीक्षकही हजर नव्हते. यादिवशी दुपारी शाळा प्रशासनाविरोधात संतप्त विध्यार्थ्यांनी शाळेतील संगणक कक्षास लक्ष्य केलं. तिथल्या संगणकांची तोडफोड केली. कक्षातील वायरींगचीही नासधूस केली आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या कृतीनंतर शाळा प्रशासन जागं झालं. या घटनेनंतर मात्र त्यांना मिळणाऱ्या जेवणात सुधारणा झाल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय.
https://youtu.be/iZWQl77rHC0