निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना १८ एप्रिल ला झालेल्या १० मतदारसंघात मतदान पार पडलेलं असून एकूण दुसऱ्या टप्प्यात दहा जागांसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. दरम्यान मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी मतदान यंत्रात (ईव्हीएम) बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दुसरीकडे सोलापुरात प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार केली आहे. सोलापूरमध्ये एका मतदान केंद्रावर वंचित आघाडीचे जरी बटन दाबल्यास भाजपला (कमळ) मत जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
येथून निवडणूक लढत असलेले काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनीदेखील काँग्रेसला केलेले मत भाजपला जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने आरोप फेटाळून लावला आहे. तेथील स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर तपासणी करून पाठवलेल्या अहवालात असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.