रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 346 वा शिवराज्यभिषेक सोहळा आज रायगड किल्यावर मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. यावेळी हजारो शिवभक्तांनी रायगड किल्ल्यावर हजेरी लावली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील वंशज खासदार संभाजी भोसले आणि खासदार उदयन भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वर्षीच्या राज्यभिषेक सोहळ्याचं वैशिष्ट म्हणजे पहिल्यांदाच शेतकरी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक करण्याचा मान मिळाला. खासदार संभाजी भोसले यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खास आमंत्रित केले होते. त्याच्या हस्ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची यथासांग पूजा करण्याचा मान देण्यात आला होता. यावेळी मैदानी कवायती खेळ उपस्थितांसमोर शिवभक्तांनी सादर केले.
हा सोहळा पाहण्यासाठी ग्रीस, चीन, बल्गेरिया, पोलंड आणि टय़ुनिशिया या देशाच्या राजदूत उपस्थित होते.
यंदा ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवभक्तांकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या मदतीसाठी निधीदेखील गोळा करण्यात येणार आहे. होते.
राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडबरीतील पुतळा व परिसर सुंदर अशा फुलांच्या आरासने सजविण्यात आला होता. राजसदरेपासून ते होळीच्या माळराना पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती पालखीतून मिरवणूक काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी शिवभक्तांनी जल्लोष केला.
जिल्हा पोलिस दलाकडून रायगड किल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 500 पोलीस अधिकारी व कर्मचारी 5 जूनपासून रायगड किल्यावर तैनात करण्यात आले होते.