राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळणार नसल्याचं भाकीत केलं असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल आणि हे सरकार अवघं १३ ते १५ दिवसात कोसळेल असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच शरद पवार यांनी खास त्यांच्या शैलीत मोठा धमाका केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
काय म्हणाले पवार
'भाजप म्हणेल आम्हाला ५०० जागा मिळतील पण भाजपचा अंदाज चुकला आहे हे नक्की. गेल्या आठ महिन्यांत भाजपच्या हातून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही राज्ये गेली आहेत. त्यावरून वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत, हे कळतं. भाजपला राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळालं तरी येणारं सरकार १३ किंवा १५ दिवसांचं असेल. भाजपला बहुमताची अग्निपरीक्षा पार करता येणार नाही'.