मुख्यमंत्री राजीनामा द्या: शरद पवार

Update: 2019-05-02 06:57 GMT

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील १५ जवानांचा मृत्यू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता, अशी सडकून टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

‘गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही’, असं म्हणत पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय म्हटलंय पवारांनी?

महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात १६ एस.आर.पी.एफ. जवान मृत्यूमुखी पडले. गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ' जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही. सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.

Similar News