राजची..... लावली रे..

Update: 2019-05-23 14:58 GMT

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये भाजपाच्या विरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचार सभांना प्रचंड गर्दीही झाली. मात्र याचा परिणाम मतदानावर झाल्याचं चित्र दिसत नाहीय. राज यांनी सभा घेतलेल्या सर्व १० मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपा युतीचेच उमेदवार निवडून आलेत. विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये झालं नाही. त्यामुळं राज यांचीच वाट लावली गेल्याचं चित्र स्पष्ट झालंय.

राज यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये एकूण १० सभा घेतल्या. यामध्ये नांदेड, सोलापूर , कोल्हापूर , सातारा, पुणे, महाड , काळाचौकी, भांडुप, कामोठे आणि नाशिकया दहा ठिकाणी सभा घेतल्या होत्या.

यासभांमध्ये त्यांनी काही व्हिडिओंच्या माध्यमातून पुरावे सादर करीत मोदी-शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. राज यांच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल,अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्वच जागांवर शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार विजयी झाल्यानं राज यांच्या सभांनी केवळ मनोरंजन झालं का मुद्दा चर्चेला आलाय. एकुणच विधानसभेसाठी जमीन तयार करणा-या राज यांना मात्र चांगलाच धक्का बसला असून त्यांच्यासाठी अनाकलनीय ठरलेल्या निकालांनी त्यांचीच वाट लागल्याचं दिसतंय.

Similar News