निवडणूकांमध्ये तरी किमान राजकीय पक्षांचे उमेदवार मतं मागण्यासाठी गावोगावी फिरतात. सध्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. मात्र, अजूनही गडचिरोली जिल्ह्यात अशी अनेक गावं आहेत जिथं दुचाकीवरूनच जावं लागतं, त्यामुळं बहुतांश उमेदवारांनी अशा गावांकडे पाठच फिरवल्याचं चित्र आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या धानोरा तालुक्यातील पदाबोरीया हे गाव. पदाबोरीयाला जाण्यासाठी तालुक्याला जोडणारा रस्ता सोडल्यावर जंगलातुन जाणाऱ्या कच्च्या रस्त्यानंचं जावं लागतं. पदाबोरीयाला जातांना पुल नसलेली छोटी नदी ओलांडुन मोठमोठे दगडधोंडे पार करून प्रवास करावा लागतो. आजुबाजुला विजेचे खांब दिसतात. रस्त्याने जाताना मोहफुले वेचणाऱ्या लोकांना निवडणुकीबाबत विचारल्यावर त्यांच्यापर्यंत मत मागायला देखील फारसे कुणी येत नसल्याचं समजलं.
पदाबोरीयाला मॅक्स महाराष्ट्रची टीम पोहोचली. गावात गेल्यावर देशात निवडणुका आहेत पण या गावात त्याचा मागमूसही नाही. कोठेही कसलेही झेंडे पत्रके दिसत नाहीत. ना लोकांमध्ये निवडणूकांविषयी चर्चा आहे. गावातील बहुतेक लोकं मोहाची फुलं वेचायला जंगलात गेले होते. प्रत्येक घरातील मातीच्या भिंतीला नवे विजेचे मीटर जोडलेले दिसले. पण याबाबत गावातील नागरिक दिनेश पदा यांच्याशी बातचीत केली असता सत्यस्थिती समोर आली.
मीटर आहे...पण वीज नाही – दिनेश पदा, ग्रामस्थ, पदाबोरीया
दोन महिन्यांपुर्वी पदाबोरीयामध्ये वीजेचे मीटर बसवण्यात आले आहेत. एक वर्षांपासून गावातलं वीजेचं ट्रान्सफॉर्मर जळालेलं आहे, म्हणून वीज नाही. वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी लेखी अर्जही दिला मात्र अजूनही वीज पुरवठा सुरळीत नाही.