विरोधकांना पुन्हा भीती ईव्हीएमचीच

Update: 2019-04-23 14:08 GMT

संपूर्ण देशभरात मोदींविरोधात जनभावना आहे, मात्र भीती ईव्हीएमचीच वाटतेय, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत संयुक्त महाआघाडीच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलंय.

भाजपला सातत्यानं मिळणारं यश हा ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला होता. त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेचा ठरेल असं वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी तीन टप्पे झाल्यानंतरच विरोधकांनी आता ईव्हीएम प्रणालीवर प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केलीय.

पवारांची भीती विरोधकांसाठी चिंतेचीच

शरद पवारांचा आजवरचा राजकीय अनुभव लक्षात घेता ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांनी ईव्हीएम प्रणालीवर व्यक्त केलेली शंका हा देशभरातील विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता असल्याची चर्चाही सुरू झालीय. देशभरात मोदींविरोधात जनभावना तीव्र असली तरी ईव्हीएम मशीनमधील फेरफार हाच खरा चिंतेचा विषय असल्याचं शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. 'मी अनेक मतदारसंघांत फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधात आहे. मात्र, ईव्हीएम मशीन हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो, असं माझं मत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

कोट्यवधी रूपये दिले तर ईव्हीएम हॅकिंग शक्य – चंद्राबाबू नायडू

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे स्वतः टेक्नोसॅवी आहेत. त्यांनीही ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्हं उभं केलंय. रशियन हॅकर्स कोट्यवधी रूपये घेऊन ईव्हीएम मशीन्स हॅक करतात, असा दावा चंद्राबाबू नायडू यांनी केलाय. याबाबतचे पुरावे नसून तशी चर्चा असल्याचं स्पष्टीकरण नायडू यांनी यावेळी दिलंय. ईव्हीएमबाबत जनजागृती कऱण्यासाठी यापुढेही काम करणार असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलंय.

Full View

Similar News